28.7 C
New Delhi
Monday, August 25, 2025
Homeताज्या बातम्या"शहरविकासासाठी हवी दोन्ही चाकांची समन्वयी धाव!"

“शहरविकासासाठी हवी दोन्ही चाकांची समन्वयी धाव!”

पिंपरी, – “प्रशासन आणि लोकप्रतिनिधी नि:स्पृह हवेत, आणि नागरिक जागरूक असले तरच खऱ्या अर्थाने शहराचा समतोल व समृद्ध विकास होऊ शकतो!” असा ठाम सूर चिंचवडगाव येथील चापेकर स्मारक उद्यानात गुरुवारी झालेल्या ‘जिजाऊ व्याख्यानमालेच्या द्वितीय पुष्पा’ दरम्यान उमटला.

गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आयोजित या पाच दिवसीय व्याख्यानमालेत “स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रशासकीय राज” या अत्यंत विचारप्रवर्तक विषयावर ऊहापोह झाला. माजी सनदी अधिकारी महेश झगडे, पुणे मनपाचे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, त्रिदल संस्थेचे संस्थापक डा. सतीश देसाई यांचे सखोल विचार या वेळी ऐकायला मिळाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र निंबाळकर होते.

प्रास्ताविकात राजाभाऊ गोलांडे यांनी, “गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकांकडे शहराचे कामकाज असून, लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीमुळे नागरिक विविध अडचणीत सापडले आहेत. म्हणूनच या विषयावर उघडपणे मंथन व्हावे, यासाठी व्याख्यान आयोजित केले,” असे सांगितले.

डॉ. सतीश देसाई यांनी पिंपरी-चिंचवडच्या प्रगत भागांचा दाखला देत, पूर्वीच्या अभ्यासू लोकप्रतिनिधींमुळे प्रशासनाला देखील जबाबदारीची जाणीव होती, अशी आठवण करून दिली. त्यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये समन्वयाचा आग्रह धरला.

उज्ज्वल केसकर यांनी पंचायतराज संकल्पनेचा इतिहास मांडून, निर्णय घेणारे लोकप्रतिनिधी आणि निर्णय अंमलात आणणारे प्रशासक हे एकमेकांवर अवलंबून असले तरी, आज त्या सहकार्याचा अभाव असल्याचे नमूद केले.

महेश झगडे यांनी, “प्रशासकीय अधिकार अनिर्बंध न राहता त्यावर अंकुश ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधी आवश्यक आहेत. पण सध्याची स्थिती पाहता संपूर्ण लोकशाही प्रणालीचे पुनर्मूल्यांकन होणे गरजेचे आहे,” असे स्पष्ट मत मांडले.

राजेंद्र निंबाळकर यांनी अध्यक्षीय भाषणात प्रशासन व लोकप्रतिनिधी हे विकासाच्या रथाची दोन चाके असल्याचा पुनरुच्चार केला. दोघांनीही परस्पर आदर व कायद्याच्या चौकटीत राहून काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे संयोजन चंद्रशेखर स्वामी, धीरज गुत्ते, एस. आर. शिंदे, मारुती भापकर, महेश गावडे यांनी केले. सूत्रसंचालन संदीप साकोरे यांनी तर आभारप्रदर्शन सुहास पोफळे यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
28.7 ° C
28.7 °
28.7 °
78 %
4.6kmh
97 %
Mon
29 °
Tue
34 °
Wed
36 °
Thu
35 °
Fri
30 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!