मुंबई– “एकेकाळी भारत जगभर व्यापार करणारा देश होता. घराघरात लघु व कुटीर उद्योग फुलत होते. त्यामुळेच भारत ‘सोने की चिडिया’ होता. आता पुन्हा एकदा ते वैभव मिळवण्यासाठी ‘स्टार्टअप’ ही केवळ योजना न राहता लोकचळवळ बनली पाहिजे,” असे स्पष्ट मत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज व्यक्त केले.
‘टेक वारी: महाराष्ट्र टेक लर्निंग वीक’ या ५ ते ९ मे दरम्यान आयोजित उपक्रमात आयोजित ‘महाराईज स्टार्टअप पिचिंग सेशन’मध्ये ते बोलत होते. या सत्रात २४ नवोन्मेषी स्टार्टअप्सनी आपले प्रकल्प सादर केले. महाराष्ट्र शासनाच्या सहा विभागांनी या स्टार्टअप्ससोबत प्रत्यक्ष काम करण्यास मान्यता दिली असून, प्रत्येकी १५ लाख रुपयांचा कार्यादेश देण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा वर्मा यांनी दिली.
ग्रामीण भागात स्टार्टअप संस्कृती रुजवण्याचा निर्धार
मंत्री लोढा यांनी नमूद केले की, “शहरांमध्ये स्टार्टअप्स मोठ्या प्रमाणात स्थापन होत असले तरी ग्रामीण भागात अजूनही हे प्रमाण कमी आहे. त्यामुळे कौशल्य आणि नावीन्यतेच्या माध्यमातून ग्रामीण(Innovation) युवकांमध्ये स्टार्टअप संस्कृती निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.”
उत्कृष्ट स्टार्टअप्सची झलक
या सत्रात सादर झालेल्या स्टार्टअप्समध्ये हेल्थटेक, एजटेक, अॅग्रीटेक, गव्हटेक, पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, स्मार्ट चष्मे, AI आधारित सेवा, स्मार्ट वेंडिंग मशीन, नॅनो तंत्रज्ञान, ड्रोन, डेटा अॅनालिटिक्स, स्मार्ट शौचालये, कचरा व्यवस्थापन, स्मार्ट हेल्मेट, थंडावा देणारी जॅकेट, ऊर्जा कार्यक्षमता आणि पर्यावरणपूरक उपाय आदींचा समावेश होता. या स्टार्टअप्सनी केवळ नावीन्यता दाखवली नाही, तर समाजोपयोगी दृष्टिकोनही मांडला.
नवीन धोरणाची माहिती
अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा यांनी सांगितले की, महाराष्ट्रात सध्या २८,४०६ स्टार्टअप्स कार्यरत असून त्यांनी ३ लाखांहून अधिक रोजगार निर्माण केले आहेत. यापैकी १४,००० हून अधिक स्टार्टअप्स महिला नेतृत्वाखाली आहेत. आगामी ‘महाराष्ट्र स्टार्टअप धोरण २०२५’ आणि ‘महाराष्ट्र स्टार्टअप विक’ यामुळे या चळवळीला अधिक बळ मिळेल.
‘स्टार्टअप रोडमॅप’चे प्रकाशन
कार्यक्रमात डॉ. युवराज परदेशी लिखित ‘स्टार्टअप रोडमॅप’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.