आ. महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; नागरिकांना दिलासा
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
चिखली-पाटीलनगर परिसरातील देहू-आळंदी रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणारा महावितरणचा जुना ट्रान्सफॉर्मर अखेर हटवण्यात येणार आहे. रस्त्याच्या मधोमध उभा असलेला हा ट्रान्सफॉर्मर वाहतूक कोंडीला प्रमुख कारण ठरत होता. नागरिकांच्या तक्रारीनंतर आमदार महेश लांडगे यांनी महावितरण प्रशासनाशी सतत पाठपुरावा करत ट्रान्सफॉर्मर स्थलांतराची मागणी केली होती. या मागणीला आता सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने, ट्रान्सफॉर्मर स्थलांतरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे.

या कामाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम रविवारी पार पडला. यावेळी कामगार नेते सचिन लांडगे, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, कुंदन गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते विनायक आबा मोरे, अंकुश मळेकर, मोरे काका, जितेंद्र यादव, संतोष मोरे, दिनेश यादव, योगेश सोनवणे आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.
या प्रसंगी माजी नगरसेवक कुंदन गायकवाड म्हणाले, “चिखली-पाटीलनगर परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी ट्रान्सफॉर्मर हटवणे अत्यावश्यक होते. स्थानिक नागरिकांनी याबाबत आमदार लांडगे यांच्याकडे सातत्याने मागणी केली होती. त्यांच्या प्रयत्नांमुळे हे काम आता प्रत्यक्षात सुरू झाले आहे.”
आ. महेश लांडगे यांची प्रतिक्रिया :
“चिखली आणि परिसरातील वाहतूक सुलभ करण्यासाठी महानगरपालिकेच्या 7 डीपी रस्त्यांची कामे सुरू केली आहेत. याशिवाय शहरातील ‘मिसिंग लिंक’ प्रश्नही लवकरच मार्गी लागेल. ट्रान्सफॉर्मर स्थलांतराच्या माध्यमातून नागरिकांना वाहतूक कोंडीतून मुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. नागरिकांचे जीवन सुलभ व्हावे, हीच आमची प्राथमिकता आहे.”