पिंपरी,- – “सत्ताधाऱ्यांची वाढती धार्मिक असहिष्णुता आणि भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्रातील सामान्य जनता पोरकी झाली आहे,” असे ठाम मत ज्येष्ठ विचारवंत हेमंत देसाई यांनी व्यक्त केले.
ते चिंचवड येथील श्री दत्त मंदिर चौक, मोहननगर येथे आयोजित व्याख्यानमालेत बोलत होते. जय भवानी तरुण मंडळ आयोजित शिव – फुले – शाहू – आंबेडकर – लोकमान्य व्याख्यानमालेच्या सहा दिवसीय मालिकेतील पाचवे पुष्प “महाराष्ट्राची दशा आणि दिशा! (यशवंतराव ते देवेंद्र)” या विषयावर गुंफताना देसाई बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते योगेश बाबर होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ लेखिका नंदिनी आत्मसिद्ध, गणेश दातीर-पाटील, प्रा. जयंत शिंदे आणि मुख्य संयोजक मारुती भापकर उपस्थित होते.
‘स्वच्छ प्रशासन’च्या दाव्यांचा भोपळा – मारुती भापकर
प्रास्ताविक करताना मारुती भापकर यांनी सध्याच्या परिस्थितीवर कठोर भाष्य करत सांगितले की, “पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नावाने सुमारे सात हजार कोटी रुपये खर्च करून शहरातील नदीची जैवविविधता नष्ट केली जात आहे. सव्वा किलोमीटर रस्त्यासाठी ८२ कोटी रुपये खर्च होत आहेत. महापालिकेच्या कारभारात भ्रष्टाचार आणि बेबंदशाही वाढली आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळातील २३ मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप असूनही कारवाई होत नाही.”
“मोदी सरकारचे ‘स्वच्छ प्रशासन’ हे केवळ केवळ एक दिखावा ठरतो आहे. या विरोधात आवाज उठवण्यासाठी जय भवानी तरुण मंडळ व्याख्यानांचं आयोजन करते,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
सुसंस्कृततेचा अभाव, वैचारिक मूल्यांची गळचेपी
हेमंत देसाई यांनी आपल्या भाषणात जुन्या आणि नव्या राजकीय नेतृत्वातील फरक अधोरेखित केला. ते म्हणाले, “माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण विरोधकांशी सुसंवाद साधत. त्यांच्याभोवती साहित्यिकांचा सन्मान होता. मात्र आजचे नेते सुसंस्कृततेऐवजी पातळीहीन विधाने करतात.”
ते पुढे म्हणाले, “आजच्या सत्ताधाऱ्यांची वैचारिक भूमिका ही मॉलमध्ये मिळणाऱ्या वस्तूप्रमाणे झाली आहे – निवडक आणि तात्पुरती. विरोधकांना संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मते मिळवण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या सवंग योजना राज्याला आर्थिक अडचणीत टाकत आहेत. फक्त आम्हीच देशभक्त आणि बाकीचे देशद्रोही, असा एककलमी डाव सत्तेतून राबवला जात आहे.”
“दिशा दाखवणारे प्रबोधन गरजेचे” – प्रा. जयंत शिंदे
प्रा. जयंत शिंदे यांनी ‘बाबू मोशाय’ या टोपणनावाने लिहिणाऱ्या हेमंत देसाईंच्या वैचारिक नेतृत्वाचे कौतुक करत सांगितले की, “देसाईंचे प्रबोधन महाराष्ट्राच्या दिशादर्शक प्रवासासाठी मोलाचे ठरेल.”
अध्यक्षीय भाषणात योगेश बाबर यांनी जय भवानी तरुण मंडळाच्या कार्याचा आढावा घेत सांगितले की, “गेल्या २५ वर्षांपासून मंडळ सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर आंदोलनात्मक संघर्ष करत आहे.”
संयोजन आणि सूत्रसंचालन
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र घावटे यांनी केले. जितेंद्र छाबडा यांनी आभारप्रदर्शन केले. दिगंबर बालुरे, दत्तात्रय मरळीकर, सुरेश बावनकर आणि परशुराम रोडे यांनी संयोजनात विशेष योगदान दिले.