पिंपरी-: प्रभाग क्र. २८ अंतर्गत येणाऱ्या रहाटणी-पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांच्या आरोग्य आणि क्रीडा सुविधांची गरज लक्षात घेता येथील महापालिकेचा दवाखाना आणि तालिम केंद्र नव्याने बांधण्यात यावेत, अशी मागणी पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधीपक्षनेते नाना काटे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या कार्यरत असलेला महापालिकेचा दवाखाना जुन्या स्वरुपाचा असून जागा अपुरी आहे. लसीकरणासारख्या उपक्रमांदरम्यान नागरिकांना उभे राहावे लागते. तात्पुरती पत्र्याची शेड बसवण्यात आली असली तरी उष्णता व पावसाळ्याच्या काळात तेथील व्यवस्था गैरसोयीची ठरते, अशी तक्रार आहे.
दवाखान्यासोबतच या परिसरातील खेळाडूंना व्यायामासाठी उभारण्यात आलेली महापालिकेची तालिमही जीर्णावस्थेत असून तिच्या देखभालीसाठी वारंवार खर्च करण्यात येतो. रहाटणी व पिंपळे सौदागर परिसरात कुस्ती, कबड्डी आणि विविध पारंपरिक खेळांतील खेळाडू मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज बनली आहे.

या पार्श्वभूमीवर, दोन्ही वास्तूंचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्या पाडून नव्याने आधुनिक दवाखाना व क्रीडातालिम केंद्र उभारण्यात यावे, अशी विनंती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे.
स्थानिक नागरिकांचा विश्वास आहे की, जर या दोन्ही महत्त्वाच्या सुविधा नव्याने सुसज्ज स्वरुपात उपलब्ध झाल्या, तर त्याचा थेट फायदा सर्व वयोगटातील नागरिकांना होणार आहे. विशेषतः महिला, लहान मुले व क्रीडाक्षेत्रातील युवक यांना या माध्यमातून प्रोत्साहन मिळेल.
मुख्य मागण्या:
- महापालिकेच्या दवाखान्याचे स्ट्रक्चरल ऑडिट व नवीन बांधकाम
- तालिम व व्यायामशाळेचे स्ट्रक्चरल ऑडिट व उच्च दर्जाचे केंद्र
- नागरिकांना लसीकरण व वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी अधिक जागेची उपलब्धता
- खेळाडूंना दर्जेदार सराव सुविधा