पिंपरी, – “आम्ही भारताचे नागरिक, आपल्या देशाच्या अहिंसा व सहिष्णुतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून या द्वारे, सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा आमच्या सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याची गांभिर्यपूर्वक प्रतिज्ञा करत आहोत तसेच आम्ही सर्व मानवजातींमध्ये शांती, सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकवू व वर्धिष्णू करू आणि मानवी जीवित मूल्ये धोक्यात आणणाऱ्या या विघटनकारी शक्तींचा प्रतिकार करू. अशी शपथ महानगरपालिकेच्या अधिकारी,कर्मचा-यांनी घेतली.यावेळी कर्मचाऱ्यांनी देशातील दहशतवाद व हिंसाचार विरोधात एकत्र येऊन देशाच्या अखंडतेसाठी लढा देण्याचा निर्धारही व्यक्त केला.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे,विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, लेखाधिकारी चारूशीला जोशी, उपलेखापाल महेश निगडे,अनिल कु-हाडे,कर्मचारी महासंघाचे मनोज माछरे,बालाजी अय्यंगार यांच्यासह महानगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.
माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांचा पुण्यतिथी दिवस हा दरवर्षी दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन म्हणून पाळला जातो तसेच या दिवशी दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ घेतली जाते.