सांगली, येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. ही आपली दुसरी परीक्षा असेल. त्या दृष्टीने सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने तयारीला लागावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सांगलीत आयोजित भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, “विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्याने अत्यंत चांगली कामगिरी केली. सगळ्यांच्या आशीर्वादाने भाजपला मोठे यश मिळाले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू करायची वेळ आली आहे.”
ते पुढे म्हणाले, “या निवडणुका एक ते दीड महिन्याच्या कालावधीत पार पडतील. कदाचित जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुका एकत्रही होतील. मागील काळात सांगली जिल्ह्याने महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये यश मिळवले. मात्र, निवडणुका न झाल्यामुळे काही अडचणीही आल्या.”
लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही, याची कारणमीमांसा करूनच विधानसभेसाठी आपण प्रभावी तयारी केली, असे सांगताना फडणवीस म्हणाले, “आपल्याला काय करता येते, हे आपण दाखवून दिले आहे. त्यामुळे या निवडणुकांतही पूर्ण ताकदीने उतरावे लागेल.”
“जिथे जिथे तुम्ही जिंकाल, तिथे निधी कमी पडू देणार नाही,” असे आश्वासनही त्यांनी कार्यकर्त्यांना दिले.