27.1 C
New Delhi
Friday, September 19, 2025
Homeमनोरंजन'जारण'च्या प्रमोशनल साँगने उडवला थरकाप

‘जारण’च्या प्रमोशनल साँगने उडवला थरकाप

गाण्यामध्ये झळकल्या सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेला ‘जारण’ हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रेक्षकांचे मन जिंकत असतानाच आता या चित्रपटातील प्रमोशनल साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या भयावह गाण्याला अमृता सुभाष, सिंधुजा श्रीनिवासन, मनीषा पांडरांकी, लक्ष्मी मेघना यांचा आवाज लाभला असून वैभव देशमुख यांच्या शब्दांनी या गाण्यात अधिकच रंगत आणली आहे. तर ए व्ही प्रफुल्लचंद्र यांच्या संगीताने या गाण्यातून चित्रपटाबद्दलची गूढता अधिकच वाढवली आहे. त्यांच्या अफलातून संगीताने हे गाणे एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे.

‘जारण’च्या पोस्टरपासूनच प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. त्यात टिझर आणि ट्रेलरने या उत्सुकतेत अधिकच भर टाकली. ‘जारण’चा ट्रेलर प्रचंड लोकप्रिय होत असून त्याला अनेक सकारात्मक प्रतिक्रियाही येत आहेत. भय, अंधश्रद्धा आणि वास्तव यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी प्रेक्षक आतूर आहेत. त्यात आता या प्रमोशनल साँगने उत्कंठा वाढवली आहे.

सोनाली आणि भार्गवीने आपल्या प्रभावी अभिनयातून या गाण्यात एक रहस्यमय आणि भीतीदायक वातावरण निर्माण केले आहे. गाण्याचा मूड संपूर्णतः भयावह, गूढतेने भरलेला असून, त्यातील संगीत, पार्श्वभूमी आणि दिग्दर्शन प्रेक्षकांच्या मनात थरकाप निर्माण करणारे आहे. गाण्याच्या माध्यमातून चित्रपटाची संकल्पना अधिकच स्पष्ट होत असून कथानकातील अस्वस्थ करणारी आणि विचारप्रवृत्त करणारी बाजू यानिमित्ताने प्रेक्षकांसमोर येत आहे.

निर्माते अमोल भगत म्हणतात, “ या गाण्यातून आम्ही ‘जारण’ची भीतीदायक आणि सोबतच भावनिक बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. संगीत, गायन आणि व्हिज्युअल्स यांचे जबरदस्त मिश्रण प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणणारे आहे. चित्रपटाचा मूड आणि आशय या एका गाण्यातून प्रभावीपणे व्यक्त होत आहे. या गाण्याची खास बाब म्हणजे सोनाली कुलकर्णी व भार्गवी चिरमुले या गाण्यात पाहायला मिळत आहेत. या दोघी उत्कृष्ट अभिनेत्री तर आहेतच याव्यतिरिक्त त्या माझ्या चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे मैत्रीखातर त्यांनी या प्रमोशनल गाण्यात सहभाग घेऊन मला व चित्रपटाच्या पूर्ण टीमला सहकार्य केले.”

संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र म्हणतात, “ ‘जारण’चे प्रमोशनल साँग तयार करताना चित्रपटाचा मूड लक्षात घेऊनच हे गाणे करायचे होते. चित्रपटाची संकल्पना कुठेही विस्कळीत होणार नाही याची काळजी घायची होती. त्यामुळे हे जरा आव्हानात्मक होते. प्रत्येक मूड, ताल, आवाज यांच्याकडे आम्ही विशेष लक्ष दिले. अर्थात हे सगळे गायक, गीतकार यांच्या साथीनेच झाले. हे गाणे कमाल बनले असून प्रेक्षकांना ते नक्की भावेल. ”

या चित्रपटाचा भाग झाल्याबद्दल सोनाली कुलकर्णी म्हणते, ‘’माझ्यासाठी हा अनपेक्षित अनुभव होता. काय गाणे असेल, आपण कोणत्या झोनमध्ये जाणार आहोत, याची मला काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे माझ्यासाठी हा सुखद धक्का होता. या प्रमोशनल साँगचा झोन खूप वेगळा आहे. गाण्याचे बोल अहिराणी भाषेत असल्याने शब्द सहज कळत नाहीत. त्यामुळे ते जाणून घेण्याची उत्सुकता वाढते. ते सतत लूपमध्ये ऐकत राहावसे वाटते. अतिशय भन्नाट गाणे आहे. मला खूप आनंद आहे, या चित्रपटाची जोडले गेले आहे. अमोल भगत माझ्या कुटुंबाचा एक भाग आहे. त्याच्या पहिल्याच चित्रपटाची निर्मिती करतोय, तर त्याच्या चित्रपटात आपले काहीतरी योगदान असले पाहिजे, असे मनात होतेच आणि ही संधी समोरून चालून आली. त्यामुळे मी त्याला त्वरीत होकार दिला. त्यात हे गाणे मला स्वत:ला खूप आवडल्याने ते करतानाही मजा आली. कोरिओग्राफी खूप कमाल आहे. सगळेच अप्रतिम आहे. शिवाय सोबत भार्गवी आहे. खूप वर्षांनी एकत्र काम करत आहोत. आवडती माणसं असल्याने काम करताना खूप मजा आली.’’

भार्गवी चिरमुले आपल्या अनुभवाबद्दल म्हणते, ‘’ माझ्यासाठी हा खूप वेगळा आणि छान अनुभव आहे. एकतर कधीही न साकारलेली भूमिका मी केली आहे. चित्रपटाविषयी मी ऐकून होते आणि सगळ्यांसारखीच उत्सुकता मलाही होती. गाण्याचे बोल, संगीत, चित्रीकरण सगळेच अप्रतिम आहे. जबरदस्त कथा, अभिनय यांचा अनुभव प्रेक्षकांना चित्रपटगृहात येईलच. परंतु या प्रमोशनल साँगचा भाग झाल्याचा माझा अनुभव खूपच छान होता. यासाठी अमोलच मनापासून आभार.’’

अनिस बाझमी प्रॅाडक्शन्स प्रस्तुत, ए अँड एन सिनेमाज, एलएलपी यांच्या सहयोगाने आणि ए३ इव्हेंट्स अँड मिडिया सर्व्हिस निर्मित ‘जारण’ चित्रपट येत्या ६ जून २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हृषीकेश गुप्ते यांनी केले असून अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. तर मनन दानिया सहनिर्माते आहेत. चित्रपटात अभिनेत्री अमृता सुभाष व अनिता दाते यांच्या प्रमुख भूमिका असून किशोर कदम, ज्योती माळशे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी, सीमा देशमुख यांचाही दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
27.1 ° C
27.1 °
27.1 °
89 %
1.5kmh
40 %
Fri
34 °
Sat
38 °
Sun
38 °
Mon
38 °
Tue
38 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!