29.7 C
New Delhi
Friday, October 10, 2025
Homeताज्या बातम्यापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य सर्वांना प्रेरणादायी: उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य सर्वांना प्रेरणादायी: उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

सोलापूर, – रणरागिणी, राजमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सबंध भारतभर बारा हजाराहून अधिक मंदिरांचा जिर्णोद्धार केला. पाण्यासाठी पाणवठे तसेच बारवे निर्माण करून जलव्यवस्थापनाचे उत्कृष्ट कार्य केले. त्यांचा आदर्श राज्यकारभार, युद्धनीती, न्यायव्यवस्था यातून सर्वांनाच प्रेरणा मिळते, असे गोरवोद्गार राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढले.

शनिवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त विद्यापीठात आयोजित विविध कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याचे ग्रामविकास, पंचायतराज मंत्री व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार रणजीतसिंह मोहिते-पाटील, कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी केले. यावेळी पीएम उषा योजनेतून दोन नवीन इमारतींचा पायाभरणी समारंभ तसेच विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थी, कर्मचाऱ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य मोठे असून त्यांच्या कार्याचा गौरव व सन्मान केंद्र व राज्य सरकारकडून त्रिशताब्दी जयंतीनिमित्त करण्यात येत आहे. 2019 मध्ये सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देऊन एक प्रकारचा सन्मान तत्कालीन सरकारकडून करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना सासरे मल्हारराव होळकर यांच्याकडून चांगली शिकवण मिळाली. पुढे त्या राज्यकारभारात व न्यायदानात पारंगत झाल्या. विद्यापीठाने त्यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा पुढे घेऊन जाताना त्यांच्या नावाप्रमाणे साजेशे कारभार करावे. विविध नवनवीन कोर्सेस सुरू करावेत. बांधकामास व विद्यापीठाच्या विविध कामास कसलाही निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या शुभेच्छा देऊन विद्यापीठातील अहिल्यादेवींच्या स्मारकाचे काम 15 जुलैपर्यंत पूर्ण होईल, असे सांगितले. एक भव्य स्मारक येथे उभा राहत असून यातून सर्वांनाच प्रेरणा मिळेल. अहिल्यादेवी होळकर यांचे काम संपूर्ण देशात आदर्शवत असे आहे. संपूर्ण देशात हिंदू मंदिरांचा त्यांनी जिर्णोद्धार केला. हिंदू संस्कृती जोपासण्याचे काम त्यांच्या हातून झाले. आज देशात त्यांच्या आदर्श विचारांचा व कार्याचा जागर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त सुरू आहे. अहिल्यादेवींच्या आदर्श समाजव्यवस्था, न्यायव्यवस्थेचे अनुकरण आजचा पिढीने केले पाहिजे. विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर केला आहे. रस्त्याचे कामही लवकरच पूर्ण होईल, असेही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी सांगितले.

कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे आदर्श विचार व कार्य डोळ्यासमोर ठेवून विद्यापीठाची वाटचाल सुरू आहे. आज विद्यापीठाची विद्यार्थिनी भुवनेश्वर जाधव हिने कराटे स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पातळीवर कांस्यपदक पटकाविले. 154 हून अधिक कौशल्य विकासाचे कोर्सेस विद्यापीठात सुरू आहेत. त्याचबरोबर पंढरपुरात आंतरराष्ट्रीय वारकरी संशोधन केंद्र सुरू करण्या संदर्भात शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तृतीयपंथी तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सोयी सुविधा केंद्र देखील सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.. यासाठी शासनाकडून मदत मिळण्याची अपेक्षा कुलगुरू प्रा. महानवर यांनी यावेळी व्यक्त केली.

महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे प्रशासकीय कार्य लोकाभिमुख होते, असे सांगून प्रशासनात आजही त्यांच्या कार्याचा पगडा आहे, असे सांगितले. या कार्यक्रमास व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे, सिनेट सदस्य तथा भाजपच्या शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, मोहन डांगरे, सिनेट सदस्य प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, गणेश डोंगरे, यतीराज होनमाने, अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीचे सदस्य अमोल कारंडे, माऊली हळणवर यांच्यासह विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, विद्यापीठ अभियंता गिरीश कुलकर्णी, विविध प्राधिकरणाचे सदस्य, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे व प्रा. श्रुती देवळे यांनी केले

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
29.7 ° C
29.7 °
29.7 °
32 %
2.6kmh
0 %
Fri
31 °
Sat
31 °
Sun
33 °
Mon
33 °
Tue
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!