पुणे – पुना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अॅण्ड आंत्रप्रेन्युअरशिप (PIMSE) च्या ‘सेवा’ या सोशल सेलतर्फे दिनांक २१ जून २०२५ रोजी वारी सेवा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत संस्थेचे कर्मचारी व स्वयंसेवक यांनी पंढरपूर वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांना अन्न साहित्य आणि पाण्याच्या बाटल्यांचे मोफत वाटप केले.
संस्थेच्या संचालक (कार्यवाह) डॉ. पोरीनिता बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच डॉ. अंजुम सय्यद आणि श्री. मोहम्मद तल्हा अहमद यांच्या समन्वयाने हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.

वारकरी संप्रदायाची परंपरा, श्रद्धा आणि भक्ती यांचा सन्मान राखत, या सेवाभावी उपक्रमातून PIMSE ने समाजाप्रती आपले उत्तरदायित्व जपत विद्यार्थ्यांमध्ये समाजप्रेम, करुणा आणि सेवाभावाची भावना दृढ करण्याचा प्रयत्न केला.
सकाळी लवकरच स्वयंसेवकांनी सेवा केंद्र उभारले आणि वारकऱ्यांच्या सोयीसाठी नियोजनबद्ध पद्धतीने वितरणाची व्यवस्था केली. उन्हाच्या तडाख्यात चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी थंड पाण्याच्या बाटल्या आणि हलक्या अन्नपदार्थांची व्यवस्था करण्यात आली होती.
उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी “माऊली माऊली” च्या जयघोषात सहभागी होत वारकऱ्यांशी संवाद साधला. अनेक वृद्ध व महिला वारकऱ्यांनी या मदतीबद्दल समाधान व्यक्त केले.
ही सेवा म्हणजे केवळ अन्नवाटप नव्हे, तर ती माणुसकीच्या भावनेची अभिव्यक्ती होती, असे मत संस्थेच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. सामाजिक भान आणि प्रत्यक्ष अनुभव यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सहकार्य आणि उत्तरदायित्वाची जाण विकसित झाली.
यापुढेही असे उपक्रम नियमितपणे राबवण्याचा संकल्प संस्थेने केला आहे. संस्थेच्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक होत असून, अन्य शैक्षणिक संस्थांसाठीही हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.