थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३२५व्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुणे यांनी भव्य अशा टू व्हीलर रॅलीचे आयोजन करण्यात आले. झाशीच्या राणीच्या पुतळ्याला अभिवादन करून केसरी वाड्या मार्गे,शनिवार वाडा येथे थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याला नमन करून रॅलीची समाप्ती झाली.
राज्यसभा खासदार डॉ. मेधाताई कुलकर्णी, अध्यक्ष डॉ. गोविंदजी कुलकर्णी, भाजप प्रवक्ता संदीप खर्डेकर, पेशव्यांचे वंशज पुष्कर सिंह पेशवा, इतिहासकार जगन्नाथ लडकत, सिने कलाकार सुनील गोडबोले, सूर्यकांत पाठक, कुंदन कुमार साठे, मकरंद टिल्लू, श्याम देशपांडे आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते व या रॅलीमध्ये दुचाकीसकट सहभागी झाले.

शिक्रापूर, चाकण, वाघोली , हडपसर तसेच पुण्यातील विविध भागातून अनेक पेशवे प्रेमी सुमारे दीडशे गाड्यांसह या रॅलीमध्ये सहभागी झाले.
रोल्स राईस विंटेज कार तसेच आपल्या युगपुरुषांचे वेशभूषा परिधान करून आलेले अनेक विद्यार्थी , पारंपरिक पोशाखात आलेले महिला व पुरुष मंडळी हे या रॅलीचे खास आकर्षण ठरले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा वारसा अटकेपार नेणाऱ्या ,शौर्याचे प्रतीक असलेल्या ,आयुष्यात एकही लढाई न हरलेले थोरले बाजीराव पेशवे यांचा इतिहास घरोघरी पोहचवणे आवश्यक आहे असे प्रतिपादन खासदार मेधाताई कुलकर्णी यांनी केले.
इतिहासकार जगन्नाथ लडकत यांनी बाजीराव पेशव्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे प्रसंग प्रसंगाचे वर्णन लोकांसमोर मांडले.

पुणे जिल्हाध्यक्ष श्री मंदार रेडे यांनी बोलताना सांगितले कि पेशवे रॅली हे यंदाचे पाचवे वर्ष आहे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने वाहतुकीचे सर्व नियम पाळत ही रॅली दरवर्षी करण्यात येते या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने युवक, युवती, विद्यार्थी, पुरुष व महिला व ज्येष्ठ नागरिक सहभागी होतात , आजच्या रॅलीला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पेशव्यांवरील प्रेम व कार्यक्रमाचे यश सांगून जातो.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या सर्व शाखा, आघाड्या व तालुका पदाधिकाऱ्यांची मोठी मदत झाली , बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त सलग पाच वर्षे प्रचंड प्रतिसादात रॅली यशस्वी करणारी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ ही कदाचित पहिली संघटना असेल यात वावगे नाही.
पेशव्यांचा इतिहास जपावा तो पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यात यावा यासाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने पुण्यात भव्य अशी पेशवे सृष्टी निर्माण व्हावी अशी मागणी केलेली आहे व त्याचा शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे अशी माहिती मंदार रेडे यांनी दिली.
.