पुणे — – विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने माध्यम क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात येणारे आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार २०२५ जाहीर झाले आहेत. ज्येष्ठ पत्रकार पुरस्काराने सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता ( डीन) आणि वृत्तपत्र विभागाचे प्रमुख डॉ. संजय तांबट, छायाचित्रकार प्रशांत खरोटे, बातमीदार सतीश वैजापूरकर, डिजीटल इन्फ़्लुएन्सर मुक्ता चैतन्य आणि आरजे शोनाली यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे परिषद व नियामक मंडळाचे कार्यवाह आनंद काटीकर यांनी पत्रकार परीषदेत दिली. यावेळी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संचालक मिलिंद कांबळे उपस्थित होते.
शुक्रवार दि. 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. सुप्रसिद्ध लेखक, वक्ते, ज्येष्ठ पत्रकार आणि दिल्ली येथील ऑर्गनायझर साप्ताहिकाचे संपादक प्रफुल्ल केतकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल. ‘राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रसार माध्यमे’ या या विषयावर यावेळी केतकर यांचे व्याख्यान होणार आहे.
नारद पुरस्कार सोहळा: माध्यम क्षेत्रातील योगदानाचा गौरव
विश्व संवाद केंद्राचे अभय कुलकर्णी म्हणाले की, राष्ट्रीय विचारांनी प्रेरित विश्व संवाद केंद्राचे देशभरात ३० हून अधिक केंद्र कार्यरत आहेत. २०१४ मध्ये पुण्यात स्थापन झालेल्या या केंद्राचे कार्यक्षेत्र पश्चिम महाराष्ट्र आहे. हे केंद्र राष्ट्रीय विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी माध्यमांशी समन्वय साधून माहितीची देवाणघेवाण करते.
आद्य पत्रकार म्हणून देवर्षी नारद यांना ओळखले जाते. त्यांच्या नावाने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे हे १४ वे वर्ष आहे. यावेळी, पश्चिम महाराष्ट्रातील माध्यम क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पाच माध्यमकर्मींना सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप ज्येष्ठ पत्रकाराला २१ हजार रुपये रोख आणि देवर्षी नारदांची मूर्ती, तर अन्य चार माध्यमकर्मिंना प्रत्येकी ११ हजार रुपये रोख आणि देवर्षी नारदांची मूर्ती असे आहे.
यापूर्वी पुरस्कार मिळालेल्या मान्यवरांमध्ये, ‘झी २४ तास’चे डॉ. उदय निरगुडकर, ‘तरुण भारत’चे किरण ठाकूर, ‘महाराष्ट्र टाइम्स’चे पराग करंदीकर, ‘सकाळ’चे सम्राट फडणीस,लोकमतचे विजय बाविस्कर, ‘देशदूत’च्या वैशाली बालाजीवाले अशा १२ जणांचा समावेश आहे.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आनंद काटीकर यांनी माध्यमांच्या विविध क्षेत्रांमध्ये उपलब्ध असलेल्या शिक्षण संधींची माहिती दिली. तसेच संस्थेचे स्वायत्त डीईएस पुणे विद्यापीठाबद्दलही त्यांनी माहिती दिली. काटीकर यांनी सांगितले की, सध्या माध्यम क्षेत्रात केवळ पत्रकारच नव्हे, तर प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी आवश्यक असलेल्या फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, वेब डिझायनिंग, ग्राफिक डिझायनिंग यांसारखे विविध अभ्यासक्रम अनेक विद्यार्थी निवडत आहेत.
या महत्त्वाच्या कार्यक्रमास माध्यम क्षेत्रातील पत्रकार आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे.