चिंचवड: नाटक हे मराठी माणसांचा श्वास आहे, मराठी माणसांनी संस्कृती जपली आहे. कामगार, औद्योगिक नगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहराचा सांस्कृतिक नगरी म्हणून झपाट्याने विकास होत आहे, यामध्ये नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांचा मोलाचा वाटा आहे, मी त्यांनी मागणी केल्या प्रमाणे शहरात नाट्य संकुल करण्यास अनुकूल असून त्यांनी सोमवारी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची भेट घ्यावी, मी त्यांना फोनवर बोलून जागा उपलब्ध करून देण्याची सूचना देतो असे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरात नाट्य संकुल उभारण्याची घोषणा केली.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेच्या २९ व्या वर्धापन दिनानिमित्त प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. या प्रसंगी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती संघटना, मुंबई चे विश्वस्त अशोक हांडे हे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष अजितदादा होते मात्र संमेलनाला येऊ न शकल्यामुळे त्यांचा मध्यवर्ती शाखेचे विश्वस्त अशोक हांडे,उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर आणि नियामक मंडळाचे सदस्य सुहास जोशी यांच्या हस्ते त्यांना स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी ‘कै. बालगंधर्व पुरस्कार’ – श्री ज्ञानेश पेंढारकर (ज्येष्ठ नाट्य संगीतकार), आचार्य प्र.के. अत्रे पुरस्कार’ – श्री संकर्षण कऱ्हाडे (अभिनेता,कवी, लेखक, निवेदक), ‘कै. अरुण सरनाईक पुरस्कार’ – प्रवीण तरडे (अभिनेता, लेखक, दिग्दर्शक) , ‘कै.स्मिता पाटील पुरस्कार’ – स्पृहा जोशी (कवयित्री, अभिनेत्री, निवेदिका) , ‘कै. जयवंत दळवी पुरस्कार’ – अरविंद जगताप (नाट्य-सिने-मालिका लेखक) आणि ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. सुरेश साखवळकर यांचा नाट्य परिषद मध्यवर्तीचा‘जीवन गौरव पुरस्कार’ मिळाल्यानिमित्त यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. तसेच सुवर्णा काळे, रति देशमुख, संदीप उर्फ जम्माड देशमुख, संदीप उर्फ बबलू जगदाळे, सोमनाथ तरटे,राष्ट्रीय खेळाडू प्रांजल जाधव यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच राज्यनाट्य स्पर्धा २०२४ चे पुरस्कार विजेत्यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले यामध्ये मनोहर जुवाटकर,कमलेश बिचे, विनायक परदेशी, अथर्व कुलकर्णी, श्रुती भोसले, दिनेश साबळे यांचा समावेश होता.
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, संयुक्त महाराष्ट्राचा सुवर्ण कलश आणणारे राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कला व संस्कृती जपणाऱ्या कलाकारांनी योग्य मान सन्मान दिला, राज्याची संकृती जपण्याचे काम या लोकांनी केले. चव्हाण साहेबांचा आदर्श घेऊन आम्ही सांस्कृतिक क्षेत्राच्या समस्या सोडवण्याच्या, कलावंत, साहित्यिकांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत असतो, राज्यकर्ते म्हणून ते आमचे कर्तव्य आहे.
पुरस्कार मिळालेल्या सर्व कलावंताचे अभिनंदन करताना अजित पवारांनी संकर्षण कऱ्हाडे यांच्या एका व्हायरल कवितेचा संदर्भ घेत मी शेतकरी असून आजही शेतात राबतो मी पोल्ट्रीत पण काम केले आहे भाऊसाहेब भोईर तेव्हा लहान होते त्यांचे वडील सोपानराव भोईर यांनी पाहिले आहे.असे नमूद केले. मी ठरवून राजकारणात आलो नाही, माझ्या स्पष्ट बोलण्याने मी राजकारणात टिकणार नाही असे अनेकांचे मत होते मात्र माझा हाच स्वभाव सामान्य जनतेला भावणार याची मला सल्ला देणाऱ्यांना कल्पना नसावी असेही त्यांनी नमूद केले.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात वाहतूक कोंडी होत असून ती सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत असे सांगताना अजित पवार म्हणाले शहरात उड्डाणपूल, मेट्रो , रिंग रोड आणि राष्ट्रीय महामार्ग यांचे जाळे तयार करण्यात येत आहे. वाहतूक कोंडीचा सर्वांना त्रास होतो, वेळ वाया जातो लवकरच यावर तोडगा निघेल असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना भाऊसाहेब भोईर यांनी पुरस्कारा मागील भूमिका मांडली. शहरात वाढत्या सांस्कृतिक चळवळीसाठी नाट्य संकुल उभारण्यात यावे अशी मागणी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.
यावेळी मान्यवर पुरस्कार्थींनी सत्काराला उत्तर देत आपले मनोगत व्यक्त केले. सोमनाथ तरटे यांच्या संबळ वादनाने झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चित्रा खरे यांनी केले तर सुहास जोशी यांनी आभार मानले.