पुणे,- : उंड्री येथील ध्रुव ग्लोबल स्कूलने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या सब ज्युनिअर गटाच्या सहाव्या जिल्हा योगासन स्पर्धेत नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलने नेत्रदीपक यश संपादन केले. त्यामध्ये मेधांश बद्रीनाथ बहादूर व निधीश योगेश तारळकर यांनी लयबद्ध पेअर्स विभागात सोनेरी कामगिरी केली त्याखेरीज या जोडीने कलात्मक क्रीडा प्रकारात रुपेरी यश संपादन केले. याच शाळेच्या खेळाडूंनी आणखी दोन रौप्यपदकांचीही कमाई केली.
लयबद्ध योगासन पेअर्स विभागात मेधांश बद्रीनाथ बहादूर व निधीश योगेश तारळकर यांनी अप्रतिम रचना सादर करताना योग्य तालमेलही साधला होता त्यामुळेच त्यांना सुवर्णपदक मिळाले. या जोडीने कलात्मक विभागातही उत्कृष्ट रचना सादर करीत रौप्य पदक मिळविले.लयबद्ध योगासन पेअर्स विभागात अस्मी अमेय जोशी व ईशानी बाहेती यांनी द्वितीय क्रमांकासह रुपेरी कामगिरी केली.
या स्पर्धेतील बॅक बेंड वैयक्तिक विभागात अद्विका जाधव ही रौप्य पदकाची मानकरी ठरली.लेग बॅलन्स वैयक्तिक विभागात ध्रुव शाळेच्या रेवा भिसे हिला चौथा क्रमांक मिळाला. खेळाडूंच्या या कामगिरीबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यशवर्धन मालपाणी व प्राचार्य संगीता राऊतजी यांनी सर्व खेळाडूंचे भरभरून कौतुक करीत सांगितले,”या खेळाडूंनी त्यांच्या वैयक्तिक नावलौकिका बरोबरच शाळेचे नावही उंचावले आहे. आम्हाला त्यांच्या कामगिरीविषयी अतिशय अभिमान वाटतो”.