पुणे : हवेली क्र. १२ येथील निबंधन कार्यालयात शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून दस्त नोंदणी झाल्याचा गंभीर आरोप वरिष्ठ लिपिक आर्यन कोळी यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर निलंबनासह कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर पाटेकर यांनी नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पाटेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन कोळी यांनी सह दुय्यम निबंधकाचा प्रभारी चार्ज घेतल्यानंतर कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय दस्त नोंदणी केली. ग्रामपंचायतीच्या मिळकती तसेच अनधिकृत बांधकामांशी संबंधित अनेक दस्तांची नोंदणी करून शासनाची फसवणूक करण्यात आली असून, गोरगरीब जनतेची मोठ्या प्रमाणावर लूट झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या व्यवहारामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवण्यात आला असल्याचेही पाटेकर यांनी नमूद केले. त्यामुळे कोळी यांनी चार्ज घेतल्यापासून चार्ज सोडेपर्यंत नोंदणी केलेल्या सर्व दस्तांची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या आरोपांच्या पार्श्वभूमीवर नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांच्यासमोर आता प्रश्न उभा राहिला आहे की, वरिष्ठ लिपिक आर्यन कोळी व इतर संबंधितांवर कारवाई होणार का?