मराठी चित्रपटसृष्टीत विविध विषयांचा वारसा असला तरी सस्पेन्स थ्रिलर या प्रकारात अजूनही प्रयोग कमी प्रमाणात झाले आहेत. अशा पार्श्वभूमीवर लेखक-दिग्दर्शक आकाश आशा नितीनचंद्र डावखरे यांनी एक हटके आणि रोमहर्षक कथा प्रेक्षकांसमोर सादर करण्याची तयारी केली आहे. ‘हॅलो कदम – त्या रात्री काय घडलं होतं?’ हा चित्रपट येत्या १९ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार असून थरार, रहस्य आणि नाट्य यांचा अनोखा मेळ घालणारा ठरणार आहे.
निर्माते संतोष सायकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या चित्रपटात अधीश पायगुडे, श्वेता कामत, सूरज सोमवंशी, प्रांजली कांजरकर , राहुल बोऱ्हाडे , सचिन बांगर, विजय प्रजापती यांनी प्रभावी भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाला श्री गुरुनाथ श्री यांचे भावपूर्ण संगीत लाभले असून आकाश संते आणि अर्पित कोमल यांनी आकाश डावखरे यांच्या गीतांना सुरेल स्वर दिले आहेत.

चित्रपटाची कथा एका नायकाभोवती फिरते — एका पोलिस अधिकाऱ्याभोवती. त्याची पत्नी आणि मुलगी यांचे अपहरण झाल्यानंतर तो मानसिक आणि शारीरिक संघर्षाचा सामना करतो. अपहरणकर्ता त्याला काही टास्क देतो, परंतु हे टास्क नेमके कोणते आणि त्यामागे काय रहस्य दडले आहे? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी प्रेक्षकांना संपूर्ण चित्रपट अनुभवावा लागणार आहे. याबाबत आकाश डावखरे म्हणाले,
“ही कथा केवळ रहस्य उलगडण्याची नाही, तर एका कुटुंबाच्या संकटात अडकलेल्या पोलिस अधिकाऱ्याच्या मानसिक संघर्षाचीही आहे. प्रेक्षकांना शेवटपर्यंत बांधून ठेवणारा हा थरारक प्रवास असेल.विशेषतः चित्रपटाची शेवटची १० मिनिटे प्रेक्षकांना सुन्न करणारी असतील.
निर्माते संतोष सायकर म्हणाले, “आमचा प्रयत्न नेहमीच वेगळ्या आणि प्रभावी विषयावर चित्रपट निर्माण करण्याचा असतो. ‘हॅलो कदम’ ही कथा पूर्णपणे वेगळ्या शैलीची असून संपूर्ण टीमने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. पुणे आणि शिरूर परिसरात चित्रिकरण झाले असून प्रत्येक दृश्यावर बारकाईने काम केले आहे.”
रहस्य, थरार, नाट्य आणि भावनिक संघर्ष यांचा समतोल राखणारा हा चित्रपट मराठी प्रेक्षकांसाठी नक्कीच एक संस्मरणीय अनुभव ठरणार आहे. १९ सप्टेंबरला आपल्या जवळच्या सिनेमागृहात हा थरारक प्रवास अनुभवायला विसरू नका!