पुणे, – : गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था (NIPHT) प्रशिक्षण देण्याचे काम करत आहे.या बरोबर परदेशी विद्यापीठांशी सामंजस्य करार करुन देशातील तसेच परदेशातील प्रशिक्षणार्थींना जागतिक पातळीवरील प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करावी. सोयी उपलब्ध करण्याचे निर्देश राज्याचे पणन मंत्री तथा राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान (NIPHT)संस्थेचे अध्यक्ष जयकुमार रावल यांनी दिले.
राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था तळेगाव दाभाडे या संस्थेच्या नियामक मंडळाच्या बुधवारी (दि.१७) आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेचे संचालक श्री मिलिंद आकरे, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक विनायक कोकरे, राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेचे व्यवस्थापक रविंद्र देशमुख व विश्वास जाधव आदी उपस्थित होते.
श्री. रावल म्हणाले, प्रशिक्षणाच्या अनुषंगाने प्रथमक्रमांने नेदरलँड इस्रायल,जपान व तांझानिया
या देशातील विद्यापीठांशी सहकार्य करून राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत प्रशिक्षण वर्ग सुरु करावे. संस्थेत नाविन्यपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम व उपक्रम राबवण्यासाठी सल्लागार समिती गठित करावी. या समितीत कृषी विभागातील, कृषी विद्यापीठातील तज्ञ अधिकारी, भारतीय कृषी संशोधन परिषद-काढणी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंदीय संस्था, लुधीयाना, राष्ट्रीय कृषी विपणन संस्था, जयपूर येथील तज्ज्ञ अधिकारी, बी-बियाणे कंपनींचे प्रतिनिधी, खत उत्पादक कंपन्यांचे प्रतीनिधी, अन्न प्रक्रीया उद्योगामध्ये काम करणाऱ्या नामवंत कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच खाजगी क्षेत्रातील प्रशिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तज्ज्ञांचा समावेश करण्याचा सूचना श्री. रावल यांनी दिल्या.

संस्थेची सभासद संख्या वाढविण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याबाबत यावी. त्यानुसार राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या, सहकारी फेडरेशन, साखर कारखाने, विविध कार्यकारी सोसायट्या, कापूस फेडरेशन व मार्केटींग फेडरेशन आदी संस्थांना सभासद करावे.
प्रत्येक बाजार समितींच्या वार्षिक अर्थसंकल्पामध्ये प्रशिक्षणासाठी तरतूद करावी तसेच बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्याना माहीती करुन देण्यात यावी असेही श्री. रावल म्हणाले.
राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था तळेगाव दाभाडे येथे त्रिभुवन सहकारी विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करा.जागतिक पातळीवरील सुगी पश्चात तंत्रज्ञान राज्यातील व देशातील शेतकऱ्याना उपलब्ध करण्यासाठी एक्झिबिशन सेंटर सुरू करावे. बदलत्या काळानुसार संस्थेमध्ये ड्रोन चालक प्रशिक्षण सुरु करावे. तसेच कृषी पर्यटन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यास मान्यता दिली. या माध्यमातून शेतकऱ्याना सुगी पश्चात तंत्रज्ञानाची माहिती देण्याचा सूचना श्री. रावल यांनी केल्या.
यावेळी श्री. आकरे यांनी राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेमध्ये त्रिभुवन सहकारी विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु करणे, परदेशी विद्यापीठाशी सामंजस्य करार करणे, नाविन्यपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम व उपक्रम राबवणे, संस्थेचे सभासद संख्या वाढविणे, बाजार समितीच्या अर्थसंकल्पामध्ये प्रशिक्षणासाठी वाढीव तरतूद करणे आदी विषयांवर सादरीकरण करण्यात आले.