पिंपरी,- : पिंपरी चिंचवड शहरातील डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालयात कला (अर्थशास्त्र) शाखेतील विद्यार्थिनींनी पिंपरी चिंचवड महापालिकेला आज भेट दिली. यावेळी त्यांना महापालिकेचे प्रशासकीय कामकाज कसे चालते, नागरिकांना महापालिकेकडून कोणकोणत्या अत्यावश्यक व इतर सुविधा दिल्या जातात, महापालिकेमध्ये कोणकोणते विभाग असतात… अशी विविध माहिती देण्यात आली.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली सहशहर अभियंता देवन्ना गट्टूवार, अजय सूर्यवंशी, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी विद्यार्थिनींना महापालिकेतील विविध प्रशासकीय कामकाजाबाबत माहिती दिली. याप्रसंगी माहिती व जनसंपर्क विभागाचे मुख्य लिपिक देवेंद्र मोरे, लिपिक अभिजित डोळस, महाविद्यालयाचे प्रा. शरद जगताप, प्रा. अश्विनी घोडके यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
महापालिकेतील स्थापत्य विभाग सर्वात प्रथम या विद्यार्थिनींना दाखवण्यात आला. येथे देवन्ना गट्टूवार यांनी शहरातील रस्ते, स्थापत्य विभाग, इमारत, बांधकाम यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर विद्यार्थिनींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन शहर नियोजन व विकासाची माहिती दिली. त्यानंतर पाणीपुरवठा व जलनिःसारण विभागात अजय सूर्यवंशी यांनी विद्यार्थिनींना शहरातील पाणीपुरवठा संरचना, पाणीपुरवठ्याचे स्रोत, वितरण व्यवस्था, पाणी साठवण व शुद्धीकरण प्रक्रिया याविषयी सविस्तर माहिती दिली. तर, प्रफुल्ल पुराणिक यांनी महापालिकेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे आणि प्राध्यापकांचे स्वागत केले तसेच त्यांना शहराच्या वेगवान वाढीसोबतच नागरिकांच्या दैनंदिन गरजांनुसार महापालिकेच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या योजनांची व प्रकल्पांची माहिती दिली.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात विद्यार्थिनींना महापालिकेकडून करण्यात येत असलेल्या विविध विकासकामांचे, शहरासाठी उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या मूलभूत सेवांचे तसेच नाविन्यपूर्ण डिजिटल उपक्रमांची माहिती देणारी चित्रफीत दाखवण्यात आली. यावेळी विद्यार्थिनींनी महापालिकेच्या विविध विभागांना दिलेल्या भेटीमुळे प्रशासनाचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाल्याचे समाधान व्यक्त केले.
……
प्रशासकीय शैक्षणिक भेटीद्वारे विद्यार्थिनींना शासन व नागरिक यांच्यातील संवाद, शहरी विकास, पायाभूत सुविधा उभारणी तसेच प्रशासकीय पारदर्शकतेचे महत्त्व समजेल. भविष्यातील समाजकारण, शासकीय सेवेत प्रवेश किंवा सामाजिक उपक्रमात सहभाग घेण्यास इच्छुक विद्यार्थिनींसाठी हा अनुभव उपयुक्त ठरणार आहे. पाण्याचा अपव्यय टाळून पाण्याचा योग्य वापर,सांडपाणी प्रक्रिया,रेनवाॅटर हार्वेस्टिंग याबाबत दिलेल्या माहितीचा प्रसार आणि प्रचार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शहरात करावा.
– अजय सूर्यवंशी, सहशहर अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका
…….
महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, या उद्देशाने आज महाविद्यालयातील विद्यार्थिनींची पिंपरी चिंचवड महापालिकेला भेट आयोजित केली होती. यावेळी महापालिकेतील विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना प्रशासकीय कामकाजाबाबत सविस्तर माहिती दिली. हा अनुभव विद्यार्थिनींच्या शैक्षणिक आयुष्यात अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
– प्रा. शरद जगताप, डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय
……..
आम्ही आतापर्यंत फक्त पुस्तकातूनच महापालिकेच्या कामकाजाची माहिती घेतली होती. मात्र प्रत्यक्ष विभागांना भेट दिल्यामुळे आणि अधिकाऱ्यांसोबत थेट संवाद साधल्यामुळे खऱ्या अर्थाने प्रशासन कसे चालते, हे जाणून घेण्याची संधी मिळाली. ही भेट आमच्या भविष्यातील करिअरसाठी प्रेरणादायी ठरेल.
– मिताली वाघ, विद्यार्थिनी, डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय
…….
पिंपरी चिंचवड महापालिकेला दिलेल्या भेटीतून आम्हाला शहर विकासाची संपूर्ण प्रक्रिया, त्यातील आव्हाने आणि त्यावर घेतल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती मिळाली. हा अनुभव आमच्यासाठी खूप प्रेरणादायी ठरला. यानिमित्ताने शहराच्या विकासात महापालिकेची भूमिका किती महत्त्वाची असते, हे देखील समजले.
– ईश्वरी तलवार, विद्यार्थिनी, डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय