पिंपरी, – – पुणे म्हणजे साहित्य कला क्षेत्राचे उगमस्थान अशी ओळख आहे. पुण्याचे जुळे शहर असलेल्या पिंपरी चिंचवडची ओळख औद्योगिक नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका, थिएटर वर्कशॉप कंपनी व पैस कल्चरल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या नाट्यमहोत्सवामुळे या शहराची ओळख कला विश्वातही अग्रस्थानी घेतली जाईल. महापालिकेने महोत्सवाला भरीव मदत करून शहराच्या सांस्कृतिक विकासाला चालना दिली आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी केले. पुढील वर्षी महोत्सव पाच दिवसांचा असावा, अशी अपेक्षा डॉ. पटेल यांनी व्यक्त केली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, थिएटर वर्कशॉप कंपनी आणि पैस कल्चरल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “रंगानुभूति: पूर्वरंग ते उत्तररंग नाट्य प्रयोग कला महोत्सव २०२५” चे आयोजन १९ ते २१ सप्टेंबर पर्यंत ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, प्राधिकरण निगडी येथे करण्यात आले आहे. या महोत्सवाचे सुरुवात शुक्रवारी (दि.१९) झाली. यावेळी डॉ. जब्बार पटेल यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महोत्सवाचे निमंत्रक आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा विभाग उपायुक्त पंकज पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला अकादमीचे प्रमुख प्रवीण भोळे, थिएटर वर्कशॉप कंपनी आणि पैस कल्चरल फाऊंडेशन संस्थापक प्रभाकर पवार आदी उपस्थित होते.
या नाट्य महोत्सवातून देशाच्या अन्य राज्यातील नाटक, एकपात्री प्रयोगांचे सादरीकरण तसेच परिसंवाद, चर्चासत्र होणार आहे. त्यामुळे माहितीचे आदानप्रदान होऊन कला अधिक सशक्त होऊन नवी दिशा मिळेल, असे डॉ. पटेल म्हणाले.
प्रेक्षकांनी जाणीवपूर्वक काही नाटके, कलाकृती पाहिल्या पाहिजेत; यासाठी नाट्य महोत्सव उपयुक्त ठरतो. एकाच ठिकाणी मराठी बरोबरच अन्य भाषांतील नाटके पाहण्याची संधी उपलब्ध होते. ‘रंगानुभूति: नाट्य महोत्सव’ अशी ओळख पुढील काळात निर्माण होईल, असा विश्वास प्रवीण भोळे यांनी व्यक्त केला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमीची स्थापना २००१ मध्ये केली. अकादमी मध्ये शास्त्रोक्त संगीत, तबला, संवादिनी वादनाचे प्रशिक्षण दिले जाते. सध्या अडीचशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. २०१३ मध्ये महापालिकेने कला क्रीडा धोरण निश्चित केले असून स्थानिक कलाकारांना नेहमीच प्रोत्साहन दिले जाते, असे पंकज पाटील यांनी सांगितले.
स्थानिक कलावंतांना नवीन व्यासपीठ निर्माण करून देण्याबरोबरच अन्य भाषांतील कलाकृती पाहता आल्या पाहिजेत. त्यामुळे कलावंत आणि कला अधिक सशक्त होईल; या उद्देशाने थिएटर वर्कशॉप कंपनी आणि पैस कल्चरल फाऊंडेशन सातत्याने कार्य करीत आहे, असे प्रभाकर पवार यांनी सांगितले.
सूत्रसंचालन आणि आभार मिलिंद बावा, तेजस्विनी गांधी – कुलकर्णी यांनी मानले.
महोत्सवाच्या सुरुवाती नंतर कर्नाटक श्री. इदागुणजी महागणपती यक्षगान मंडळी केरेमाने कर्नाटक यांचे पंचवटी ही कथानाट्य असलेली – यक्षगान प्रयोगकला सादर करण्यात आली. कार्यक्रमास कलाक्षेत्रातील व्यक्ती, रसिक प्रेक्षक उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन
“रंगानुभूति: पूर्वरंग ते उत्तररंग नाट्य प्रयोग कला महोत्सव २०२५” चे उद्घाटन आज शनिवारी (दि. २०), दुपारी ३ वाजता, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यावेळी पिंपरी चिंचवड परिसरात नाट्यकलेसह सांस्कृतिक क्षेत्रात योगदान असणाऱ्या संस्थांचा “प्रयोगकला सन्मान” हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त व महोत्सवाचे निमंत्रक शेखर सिंह यांनी दिली आहे.
या महोत्सवात पैस करंडक स्पर्धेत नाट्यछटा, एकपात्री अभिनय, लघु नाटिका, मूकनाट्य व पथनाट्य स्पर्धा तर महोत्सवात रसिकांसाठी मराठी, हिंदी, कन्नड नाटकांसह चित्रकला प्रदर्शन व शहराचा सांस्कृतिक वारसा मांडणारे रंगदर्शन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवेश विनामूल्य आहे; विनामुल्य प्रवेशिकां साठी व अधिक माहितीसाठी संयोजन समितीतील प्रियांका राजे यांच्या ८६००९००३९० क्रमांकावर संपर्क साधावा असे अमृता ओंबळे यांनी केले आहे.