पिंपरी,- : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद व राज्य रक्त संक्रमण परिषद यांच्या अधिसूचनेनुसार राष्ट्रीय स्वेच्छिक रक्तदान सेवा पखवाडा साजरा करण्यात आला. शहरवासीयांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद देत ८० नागरिकांनी रक्तदान केले असून ३६८ नागरिकांनी हिमोग्लोबिन व रक्तगट तपासणीचा लाभ घेतला आहे.
या उपक्रमासाठी वाय.सी.एम. रुग्णालयाच्या रक्तकेंद्रामार्फत विविध ठिकाणी रक्तदान, हिमोग्लोबिन चाचणी व रक्तगट तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. तसेच स्वेच्छिक रक्तदान व अवयवदान करण्याची शपथ देण्यात आली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. या अभियानाला अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, पदवीत्तर संस्था वाय.सी.एम. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, पॅथॉलॉजी विभाग प्रमुख डॉ. तुषार पाटील, वाय.सी.एम. रुग्णालय नोडल ऑफिसर डॉ. छाया शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. उज्वला अंदुरकर, डॉ. मीनाक्षी सूर्यवंशी, डॉ. शैलजा भावसार, डॉ. मीना सोनवणे, डॉ. नीता घाडगे, डॉ. हर्षदा बाविस्कर तसेच रक्तकेंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

यावेळी अधिकाधिक नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान व अवयवदान करावे तसेच महापालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाचा लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकीय विभागाच्या वतीने करण्यात आले.
“रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. या उपक्रमातून नागरिकांनी मोठ्या संख्येने पुढाकार घेऊन रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरात सहभाग नोंदवला ही आनंदाची बाब आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात आरोग्याविषयी जागरूकता वाढते आणि आरोग्यदायी पिढी घडण्यास मदत होते,” डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.