श्री देवी चतुःशृंगी मंदिर ट्रस्टतर्फे यावर्षीचा नवरात्रोत्सव 22 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. मागील शंभर वर्षांपासून चालत आलेली परंपरा कायम ठेवत, मंदिर ट्रस्टने भाविकांसाठी विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांची आखणी केली आहे.
धार्मिक कार्यक्रम
नवरात्रोत्सवाची घटस्थापना सोमवार, 22 सप्टेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता मंदिर व्यवस्थापक विश्वस्त श्री. रविंद्र अनगळ यांच्या हस्ते होणार आहे. यानंतर अभिषेक, रुद्राभिषेक, महावस्त्र अर्पण आणि महापूजा करण्यात येईल. या सर्व पूजाविधीचे पौरोहित्य श्रीराम नारायण कानडे गुरूजी पार पाडणार आहेत.
दररोज सकाळी 10 वाजता व रात्री 8 वाजता महाआरती होईल. या वेळी शंखनाद पथकाचा गजर भाविकांना ऐकायला मिळेल. गणपती मंदिरात दररोज भजन, कीर्तन, प्रवचनांचे आयोजन आहे. तसेच श्रीसूक्त, ललितासहस्त्रनाम, महिषासुर मर्दिनी स्तोत्र, वेदपठण
विशेष कार्यक्रम
- 27 सप्टेंबर रोजी गोखलेनगरच्या सुयोग मित्र मंडळाच्या वतीने निवारा वृद्धाश्रमातील महिलांसाठी ‘आजीबाईंचा भोंडला’ आयोजित केला जाणार आहे.
- 1 ऑक्टोबर रोजी सायं 7 वाजता नवचंडी होम होईल.
– 2 ऑक्टोबर दसऱ्याच्या दिवशी सायं 5 वाजता सिमोल्लंघनाची पालखी मिरवणूक काढली जाणार आहे. बँड, ढोल-ताशा, लेझीम, नगारा, चौघडा यांचा जल्लोष, सेवेकऱ्यांचा सहभाग, तसेच हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी यावेळी आकर्षण ठरणार आहे. यंदा मराठी सिनेसृष्टीतील कलावंतांचे ढोल-ताशा पथक हे विशेष आकर्षण असेल.
मंदिर विकास व सुविधा
मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम सुरु असून सभामंडपाचे 80% बांधकाम पूर्ण झाले आहे. हा नवीन सभामंडप पूर्वीच्या सभामंडपाच्या दुपटीने मोठा आहे. भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता येईल, अशी ट्रस्टची हमी आहे.
भाविकांसाठी पार्किंगची विनामूल्य सोय पॉलिटेक्निक मैदानावर केली आहे. मैदानापासून मंदिरापर्यंत प्रथमच ई-रिक्शा व गोल्फ कार्ट सेवा उपलब्ध असेल. दर्शनासाठी बॅरिकेटिंगसह रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे.
सुरक्षा व आरोग्य
भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिस, निमलष्करी दल, सुरक्षारक्षक व स्वयंसेवक तैनात असतील. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा मंदिर परिसरात उभारण्यात आली आहे.
आरोग्याच्या दृष्टीने जंतुनाशक फवारणी, कार्डियाक अँब्युलन्स, 24 तास 4 डॉक्टर व सपोर्ट स्टाफ, तसेच महानगरपालिकेच्या वतीने ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियान राबविले जाईल. औषधोपचाराची मोफत सुविधा उपलब्ध असेल.
अग्निशामक दलाची गाडी, आपत्ती व्यवस्थापनासाठी अनिरुद्ध सेवा केंद्राचे 150 स्वयंसेवक, आणि भाविकांच्या विम्याची रूपये 2 कोटींची संरक्षण योजना लागू करण्यात आली आहे.
पर्यावरणपूरक उपक्रम
ग्रीन हिल्स समूहाच्या सहकार्याने मंदिर मागील डोंगरावर वृक्षलागवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, देवीला वाहिलेल्या फुलांच्या निर्माल्यापासून सेंद्रिय खत तयार करून झाडांची देखभाल केली जाते.
ऑनलाईन सुविधा
भाविकांना दर्शनाची सुलभता व्हावी यासाठी www.chatushrungidevi.com या संकेतस्थळावरून ऑनलाईन पास मिळू शकतात. तसेच ऑफलाईन पास वितरणासाठी तीन काऊंटर मंदिर परिसरात ठेवले आहेत.