पुणे – अम्ब्रोसिया इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटने विद्यार्थ्यांच्या सहकार्याने भारतीय प्रादेशिक पाककृती खाद्य महोत्सवाचे आयोजन केले होते. भारताच्या कानाकोपऱ्यातील पाककृतींसह सांस्कृतिक कार्यक्रम, विनोदी सादरीकरणे, हास्य आणि खाद्य मेजवानीचा पुणेकरांनी भरभरून आस्वाद घेतला.


या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरली पुण्याच्या ऐतिहासिक शनिवारवाड्याची खाण्यायोग्य प्रतिकृती. तब्बल १५० किलोग्रॅम वजनाच्या चॉकलेट केकमधून दिल्ली दरवाजा, भिंती, गॅलरी, आतील परिसर आणि बुरुज अत्यंत आकर्षकपणे साकारले होते. प्रतिकृतीत चॉकलेट, फोंडंट आणि साखरेच्या शिल्पकलेचा कौशल्यपूर्ण वापर करण्यात आला. प्रा. श्रेया वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली यश घारे, सुप्रिया शिंदे, गायत्री तुप्तेवार, इशिता देव, जुई घाटे आणि प्रतीक शिंदे यांच्यासह एकूण १५ विद्यार्थ्यांनी हा मेगा केक साकारला. या केकची दीड फूट उंची आणि ४ x ५ फूट लांबी असून सलग ५ दिवसांच्या मेहनतीनंतर तो पूर्ण करण्यात आला.
त्याचबरोबर महाराष्ट्र, गोवा, उत्तर प्रदेश, अवध, ओडिशा, आंध्रप्रदेश, गुजरात इत्यादी राज्यांतील विविध पाककृतींची मेजवानी सादर करण्यात आली. एकूण ३६ विविध पाककृतींची चविष्ट मेजवानी पुणेकरांसमोर ठेवली गेली. या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या पालकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. महोत्सवात एकूण ७० विद्यार्थी सहभागी झाले.

हा मेगा केक गुजरातचे सुप्रसिद्ध विल्यम जॉन्स पिझ्झा आणि मॅड ओव्हर ग्रिल्स यांच्या सहकार्याने तयार करण्यात आला होता. तसेच ग्लोबल एज्यु कनेक्ट्स आणि बारामती अॅग्रो यांनीही मोलाचे सहकार्य दिले. याप्रसंगी अम्ब्रोसिया इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचे सचिव सत्या नारायण, सहसचिव महुवा नारायण, प्राचार्या प्रा. नम्रता डिसुझा, प्रा. नचिकेत आराध्ये आणि प्रा. निमाई काशीकर उपस्थित होते.