स्त्री म्हणजे शक्ती, त्याग आणि नवनिर्मितीची प्रेरणा. आयुर्वेद म्हणजे केवळ जडीबुटी नव्हे, तर जीवन जगण्याची समग्र पद्धती. या दोन्हींचा संगम साधत हडपसरमध्ये गेली सोळा वर्षे आरोग्यसेवेचा दीप प्रज्वलित करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. स्वाती नलगे. ‘आत्रेय आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक’ या नावाने त्यांनी एक छोट्या सेटअपपासून प्रवास सुरू केला आणि आज ते सर्वसमावेशक आरोग्यकेंद्र बनले आहे. कोविडनंतर लोकांनी आयुर्वेदाची ताकद अनुभवली, गैरसमज दूर केले आणि उपचारांवरील विश्वास दृढ केला. रुग्णांच्या चेहऱ्यावर उमटणारा आनंद हा त्यांच्यासाठी खरी प्रेरणा आहे, तर कुटुंबाचा ठाम आधार ही त्यांची खरी ताकद. स्त्रीशक्तीचा उन्मेष, आयुर्वेदाची समग्रता आणि समाजसेवेचा ध्यास या त्रिसूत्रीवर उभं राहिलेलं हे कार्य आज अनेकांना मार्गदर्शक ठरत आहे.

हडपसरमध्ये ‘आत्रेय आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक’ मार्फत गेली सोळा वर्षे रुग्णसेवा करणाऱ्या डॉ. स्वाती नलगे यांनी आयुर्वेदाच्या माध्यमातून आरोग्याचा एक नवीन दृष्टिकोन समाजासमोर उभा केला आहे. अनेक विद्यार्थी आयुर्वेद शिकून नंतर अलोपॅथीकडे वळतात, मात्र भारतीय संस्कृतीशी जोडलेपण जपत त्यांनी आयुर्वेदाची निवड केली. सुरुवातीला आव्हाने होती, लोक आयुर्वेदाकडे केवळ जडीबुटी म्हणून पाहत होते, पण कालांतराने आणि प्रचारामुळे स्वीकार्यता वाढत गेली.
शिक्षणाच्या काळात गुरुजनांकडून मिळालेलं शास्त्रज्ञान, प्रत्यक्ष पाहिलेली पंचकर्माची ताकद आणि रुग्णांचा आनंद यामुळे त्यांचा आत्मविश्वास दृढ झाला. त्या सांगतात, “आयुर्वेद म्हणजे फक्त पंचकर्म नव्हे आणि तो मंद उपचार करणारा शास्त्रही नाही. उलट हा जीवनाचा समग्र दृष्टिकोन आहे.
त्यांच्या कारकिर्दीत अनेक प्रेरणादायी अनुभव आहेत. एखाद्या दांपत्याला वर्षानुवर्षे उपचार घेऊनही अपत्य होत नसेल, पण आयुर्वेदिक पंचकर्मानंतर त्यांच्या घरी बाळ आल्यावर उमटणारा आनंद – हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठं यश ठरतं. रुग्णांना त्यांच्या आजाराबद्दल अगदी सोप्या भाषेत समजावून सांगणे आणि उपचारानंतर त्यांच्या जीवनात होणारा बदल यामुळे विश्वास अधिक दृढ होतो.

डॉ. नलगे यांचा प्रवास सहज नव्हता. एक स्त्री म्हणून घर आणि क्लिनिकची जबाबदारी निभावताना तारेवरची कसरत करावी लागते. मात्र आई-वडील, आजी आणि पती डॉ. दत्तात्रय नलगे यांचा ठाम पाठिंबा त्यांच्या पाठीशी होता. या बळावरच त्यांनी छोट्या सेटअपमधून सुरुवात करून आज क्लिनिकला सर्वसमावेशक आरोग्यकेंद्रात परिवर्तित केले आहे.
आयुर्वेदात आज नवे ट्रेंड्स दिसत आहेत. लाइफस्टाइल डिसीजेसवर आयुर्वेदिक उपचार, बीजसंस्कार, नैसर्गिक कॉस्मेटिक्सचा वापर आणि स्त्रियांसाठी बस्ती-शिरोधारा सारखे उपाय – या सर्वांनी आयुर्वेदाची ताकद अधोरेखित केली आहे. कोविडनंतर लोकांनी नैसर्गिक उपचारांना जास्त पसंती द्यायला सुरुवात केली आहे.

“शास्त्रावर विश्वास ठेवा, मेहनत करा आणि प्रामाणिकपणे काम करा. आयुर्वेदात करिअरच्या अनेक संधी आहेत,” असा संदेश त्या तरुणांना देतात. आयुर्वेद समाजात First Choice of Treatment व्हावा यासाठी त्या सातत्याने उपक्रम राबवत आहेत.
त्यांच्या कार्यातली खरी प्रेरणा म्हणजे – रुग्णांच्या जीवनात झालेला सकारात्मक बदल आणि त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारा आनंद. स्त्रीची शक्ती, आयुर्वेदाची ताकद आणि समाजसेवेची अखंड वाटचाल या त्रिसूत्रीवर उभं राहिलेलं त्यांचं कार्य आज अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.