पिंपरी – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (पीसीसीओईआर) येथे “सस्टेनेबिलिटी इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग अँड डिझाईन” या विषयावरील पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.
थर्मॅक्स लि.चे इनोव्हेशन विभागाचे मुख्य डॉ. आर. एस. झा यांनी “बॉयलर डिझाईनमधील नवे ट्रेंड्स” या विषयावर मार्गदर्शन केले. बॉयलरची कार्यक्षमता शंभर टक्क्यांपेक्षा जास्त कशी वाढविता येऊ शकते, एच टू ओ गणितीय मॉडेलिंग व थर्मल सिस्टीम्सच्या सिम्युलेशनचा उपयोग, तसेच कंडेन्सिंग टेक्नॉलॉजी, लो-एनवोक्स बर्नर्स, व्हीओक्स, मल्टिपल हीट एक्स्चेंजर्स, टर्ब्युलेटर्स आणि व्हेअरेबल-प्रायमरी पायपिंग यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाविषयी झा यांनी सविस्तर माहिती दिली.

द सॉल्ट सिस्टिम्सच्या संचालिका आदित्य माळिक यांनी “सस्टेनेबिलिटी” या विषयावर मार्गदर्शन केले. आजच्या काळातील रुपांझेल जर शाश्वत घरात राहिली. उदाहरणार्थ बांबूच्या घरात तर तिचा प्रिन्स चार्मिंग तिच्या मदतीला पोहोचणं अधिक सोपं होईल. याचप्रमाणे शाश्वतता ही आपल्या जीवनाला अधिक परिणामकारक आणि कार्यक्षम बनवू शकते, असे माळिक यांनी सांगितले.या परिषदेमुळे विद्यार्थ्यांना व उपस्थित तज्ज्ञांना ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञान, शाश्वत डिझाईन व पर्यावरणपूरक उपाययोजना याविषयीची माहिती मिळाली.
या परिषदेसाठी महाराष्ट्रासह विविध राज्यांमधून शंभर पेक्षा अधिक संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले. संशोधन पत्र सादरीकरण, तांत्रिक सत्रे व चर्चासत्रांच्या माध्यमातून शाश्वतता व डिझाईन क्षेत्रातील नवनवीन संकल्पना मांडण्यात आल्या.यावेळी प्राचार्य डॉ. हरिश तिवारी, विविध विद्या शाखेचे अधिष्ठाता, मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.