पुणे : पुण्यनगरीच्या वैभवशाली सांस्कृतिक परंपरेत या वर्षी आदिशक्ती माता सच्चीयाय देवीच्या नवरात्री (NAVRATR)पावन पर्वानिमित्त श्रीमद् भागवत कथा तथा नवरात्री कीर्तन महोत्सव भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. नाम-ज्ञान-प्रेम-दानाचा संगम घडविणाऱ्या या धार्मिक उत्सवात भक्तीसंगीत, पारायण, हरिपाठ, कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन श्री दगड जीवदया संस्था जवळ,आगम जैन मंदिर समोर, कात्रज,पुणे येथे करण्यात आले आहे. आज पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मातेचे दर्शन घेऊन पुणेकरांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी श्री सुसवाणीमाता सच्चीयायमाता चॅरिटेबल ट्रस्टचे आयोजक प्रमोद दुगड, मोनल दुगड आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, पुणेकरांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ,आज दुगड परिवाराच्या निमंत्रणांवरून माता सच्चीयाय देवीची आरती करण्याचा योग आला, मंदिरात येऊन अतिशय प्रसन्न वाटले. दुगड परिवार राबवत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचेही पोलिस आयुक्तांनी यावेळी कौतुक केले.
मोनल दुगड म्हणाल्या, माणिकशेठ दुगड यांनी 35 वर्षांपूर्वी आदिशक्ती माता सच्चीयाय देवीच्या मंदिराची उभारणी केली. येथे नवरात्री मध्ये विविध धार्मिक कार्य करत आहोत, यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण, स्त्री सूक्त पठण , याशिवाय येथे गोशाला आहे, चारशे हून अधिक गायांचा सांभाळ आम्ही करत असून इतरांच्या आजारी गायींना इथे आणले तरी आम्ही त्यांच्यावर योग्य ते उपचार करतो त्यांची काळजी घेतो, अन्नछत्र 24 तास सुरू असते, आज दुगड यांची चौथी पिढी देवीच्या सेवेत आहे.
प्रमोद दुगड म्हणाले, आदिशक्ती माता सच्चीयाय देवीच्या नवरात्री पावन पर्वानिमित्त दरवर्षी विविध धार्मिक उपक्रम आम्ही घेत असतो. यंदाही धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. आदिशक्ती माता सच्चीयाय देवीच्या नवरात्री पावन पर्वानिमित्त श्रीमद् भागवत कथा तथा नवरात्री कीर्तन महोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करत आहोत. अष्टमीच्या दिवशी महाकुंभ महोत्सव होत आहे, यामध्ये 108 जोडपी हवन करणार आहेत. सर्व उपक्रम गौरव दुगड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचे प्रमोद दुगड यांनी नमूद केले.