पिंपरी, – पिंपरी चिंचवड शहरातील निगडी येथे मेट्रोचे काम सुरू असताना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पंपिंग झोनला पाणीपुरवठा करणाऱ्या १२०० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला अचानक धक्का लागून पाणीगळती सुरू झाली. ही गळती रोखण्याचे काम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून युद्धपातळीवर करण्यात येत आहे. या भागातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
गळती रोखण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. हे काम तातडीने पूर्ण करून उद्या (२६ सप्टेंबर) सकाळपर्यंत पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचा पाणीपुरवठा विभागाचा प्रयत्न आहे. या कामामुळे चिखली, तळवडे, नेहरूनगर, संत तुकारामनगर, महेशनगर, कुदळवाडी, शाहूनगर, अजंठानगर, म्हेत्रेवस्ती, त्रिवेणीनगर, जाधववाडी, बोऱ्हाडेवाडी आदी भागांतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तरी नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून पाणीपुरवठा लवकरात लवकर नियमित करण्यासाठी पाणीपुरवठा विभाग प्रयत्नशील आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे.
- प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका