दुबई : आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात तिलक वर्मा, शिवम दुबे व संजू सॅमसन यांच्या वादळी खेळीमुळे भारताने पाकिस्तानला धुळीस माखवत आशियात पुन्हा एकदा आपला दबदबा सिद्ध केला. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या लढतीत भारताने 19.4 षटकांत 5 बाद 150 धावा करून 5 गडी राखून सनसनाटी विजय संपादन केला.

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने सुरुवातीला धमाकेदार खेळ दाखवला. फरहान व झमान या जोडीने 84 धावांची जोरदार भागीदारी केली. परंतु एकदा ही जोडी तंबूत परतल्यावर कुलदीप यादव (4 बळी), अक्षर पटेल व वरुण चक्रवर्ती यांच्या धारदार गोलंदाजीसमोर पाकिस्तानचे उरलेले फलंदाज कात्रीत सापडले आणि संपूर्ण संघ अवघ्या 146 धावांत गारद झाला.

147 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने सुरुवातीला तीन गडी गमावले. अभिषेक शर्मा (5), सूर्यकुमार यादव (1) व शुभमन गिल (11) स्वस्तात बाद झाल्याने भारताची 3 बाद 20 अशी दैना उडाली. या संकटसमयी तिलक वर्मा (नाबाद 69) व संजू सॅमसन (24) यांनी चौथ्या गड्यासाठी 57 धावांची भागीदारी साकारत डाव सावरला.
यानंतर शिवम दुबे (33) ने तुफानी खेळी करत तिलकला साथ दिली. विजयासाठी शेवटच्या 3 षटकांत 30 धावांची गरज असताना भारताने अचूक फटकेबाजी करून समीकरण सोपे केले. अखेर शेवटच्या षटकात तिलकने सलग फटके मारत विजय जवळ आणला आणि रिंकू सिंगने चौकार ठोकत विजयी शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी फरहानने अर्धशतक झळकावले, मात्र यावेळी तो नेहमीप्रमाणे दिखाऊ सेलिब्रेशनला मुकला. भारताने पाकिस्तानच्या उरलेल्या फलंदाजांना दुहेरी आकडाही पार करू दिला नाही.

या विजयासह भारताने आशिया चषकातील नववे जेतेपद पटकावले. सामन्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाचे अभिनंदन करत “खेळाच्या मैदानावर ‘ऑपरेशन सिंदूर’, परिणाम तोच – भारताचा विजय!” असे ट्विट केले.
भारताच्या या पराक्रमात तिलक वर्मा हा खरा हिरो ठरला, ज्याने संयम आणि आक्रमणाची सांगड घालत पाकिस्तानच्या विजयाच्या सर्व आशा नेस्तनाबूत केल्या.