मुंबई : आपल्या मोहक नृत्यकलेने आणि अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री व नृत्यांगना संध्या शांताराम (वय 94) यांचे निधन झाले आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला त्यांनी दिलेले योगदान आजही प्रेक्षकांच्या स्मरणात कायम आहे.
‘पिंजरा’ चित्रपटातील त्यांची तमाशा नर्तकीची भूमिका आजही अजरामर मानली जाते. त्यांच्या अभिनयाची झलक मराठी सिनेप्रेमी विसरू शकलेले नाहीत.

संध्या यांना नृत्यप्रधान सिनेमांनी विशेष ओळख दिली.
‘झनक झनक पायल बाजे’ आणि ‘नवरंग’ या चित्रपटांसाठी त्यांनी प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गोपीकृष्ण यांच्याकडून नृत्याचे प्रशिक्षण घेतले होते. ‘आधा है चंद्रमा रात आधी’ आणि ‘अरे जा रे हट नटखट’ या गाण्यांतील त्यांची अदाकारी आजही रसिकांच्या मनात घर करून आहे.
चित्रपट दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या त्या तिसऱ्या पत्नी होत्या. ‘दो आंखें बारह हाथ’, ‘झनक झनक पायल बाजे’, ‘जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ अशा अनेक चित्रपटांत त्यांनी शांताराम यांच्यासोबत काम केले.

‘पिंजरा’ हा त्यांचा सर्वाधिक गाजलेला सिनेमा ठरला. त्यांच्या नृत्य-अभिनयाने त्या काळातील तमाम प्रेक्षकांना वेड लावले.
संध्या शांताराम यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी परळ येथील राजकमल स्टुडिओमधून अंत्ययात्रा काढून शिवाजी पार्क येथील वैकुंठधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार, सहकारी आणि चाहत्यांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली.