पुणे महापालिका निवडणुकीसाठी पाच हजार मतदान केंद्रांची आवश्यकता; प्रशासनाचे नियोजन सुरू!
पुणे : आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी सुमारे पाच हजार मतदान केंद्रांची आवश्यकता असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यासाठी योग्य जागांची पाहणी करण्यास आणि केंद्रनिहाय नियोजनाला सुरुवात करण्यात आली आहे. तसेच, मतदारयादीतील घोळ टाळण्यासाठी महापालिकेने ‘सॉफ्टवेअर’चा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
राज्य निवडणूक आयोगाने पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचनेला मान्यता दिल्यानंतर महापालिकेच्या निवडणूक तयारीला गती मिळाली आहे. प्रभागरचनेनुसार मतदारयादीचे विभाजन आणि मतदान केंद्रांची निश्चिती ही महत्त्वाची कामे प्रशासनासमोर आहेत. या संदर्भात अतिरिक्त आयुक्त दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत बूथनिहाय जबाबदाऱ्या, केंद्रनिहाय नियोजन आणि मनुष्यबळाचे वाटप यावर सविस्तर चर्चा झाली.
मतदान केंद्रांसाठी जागांची निवड आणि तयारीची जबाबदारी महापालिकेचे उपायुक्त अरविंद माळी यांच्याकडे देण्यात आली आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत किती केंद्रे होती, तसेच नवीन केंद्रे कुठे वाढवता येतील, याचे परीक्षण सुरू आहे. आगामी निवडणुकीसाठी साधारणपणे ५,००० मतदान केंद्रे आवश्यक असल्याचा अंदाज बैठकीत वर्तविण्यात आला.
यासोबतच, मतदारयादीच्या विभागणीसाठी अत्याधुनिक सॉफ्टवेअरचा वापर करण्यात येणार आहे. यापूर्वी हे काम पूर्णतः मनुष्यबळावर अवलंबून होते, मात्र आता सॉफ्टवेअरच्या मदतीने त्रुटी आणि गोंधळ टाळणे शक्य होणार आहे. “अनेकदा एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या प्रभागात नोंदली जातात किंवा काहींची नावे वगळली जातात. हे प्रकार टाळण्यासाठी प्रशासन विशेष दक्षता घेणार आहे,” असे दिवटे यांनी सांगितले.
दरम्यान, पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने अंतिम प्रभागरचना जाहीर केली आहे. प्रारुप आराखड्यावर मोठ्या प्रमाणात हरकती आणि सूचना नागरिक तसेच राजकीय प्रतिनिधींनी नोंदविल्या होत्या. त्यानुसार काही प्रभागांत किरकोळ बदल करण्यात आले असून, आठ प्रभागांच्या नावांमध्ये बदल करण्यात आला आहे. तसेच, यंदा पहिल्यांदाच १२ प्रभागांमध्ये रचना बदल करण्यात आले आहेत.
या सगळ्या घडामोडींमुळे पुणे महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून, प्रशासन मतदारांना सुलभ आणि अचूक मतदान सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट होत आहे.