राजकीय पाठबळ नाही, कुठलीही संस्था नाही… फक्त शिक्षकांची ताकद, शिक्षकांसाठीचं काम आणि चळवळीची श्रद्धा! या बळावरच पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी पुणे विभागातील तब्बल ७७,१७६ शिक्षकांपर्यंत मतदार नोंदणी फॉर्म पोहोचवून एक विक्रमच घडवला आहे.
शिक्षक मतदार नोंदणीचे अभियान सध्या जोरात सुरू आहे. पुढील वर्षी होणाऱ्या पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे अभियान महत्त्वाचे ठरत आहे. त्यासाठी शिक्षकांनी मतदार म्हणून नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. हे काम शिक्षक चळवळीतूनच होत असल्याने त्याला विशेष प्रतिसाद मिळत आहे.
दत्तात्रय सावंत यांनी या मोहिमेची जबाबदारी स्वतः घेतली असून, त्यांच्या सहकाऱ्यांनी पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या पाचही जिल्ह्यांतील शिक्षकांपर्यंत पोहोचून नोंदणी फॉर्म वाटप केले.
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ हा संपर्कासाठी भौगोलिकदृष्ट्या अतिशय मोठा आणि आव्हानात्मक मतदारसंघ आहे. या मतदारसंघात ५८ तालुके असून, प्रत्येक गावात शाळा आहेत. सावंत यांच्या सहकाऱ्यांनी या प्रत्येक शाळेत जाऊन शिक्षकांना मतदार नोंदणीसंबंधी मार्गदर्शन केले.
गेल्या २५ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले दत्तात्रय सावंत यांनी या कालावधीत पाच जिल्ह्यांतील प्रत्येक शाळांशी वैयक्तिक स्नेह जपला आहे. त्यामुळेच त्यांच्या आवाहनाला शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या अभियानात —
- पुणे जिल्ह्यातील १,२४७ शाळांमधील २२,७१० शिक्षकांपर्यंत,
- सोलापूरच्या १,०८० शाळांतील १८,७२० शिक्षकांपर्यंत,
- कोल्हापूरच्या ८५९ शाळांतील १३,५५० शिक्षकांपर्यंत,
- साताऱ्याच्या ७४९ शाळांतील ११,४५० शिक्षकांपर्यंत,
- आणि सांगलीच्या ६९० शाळांतील १०,७४६ शिक्षकांपर्यंत
नोंदणी फॉर्म पोहोचवले गेले आहेत.