१० MVA क्षमतेचे नवीन रोहित्र आणि स्वतंत्र वीज वाहिनी कार्यान्वित
पिंपरी-चिंचवड – दिघी आणि परिसरातील नागरिकांना अनेक महिन्यांपासून त्रस्त करणाऱ्या वीज समस्यांवर अखेर कायमस्वरूपी तोडगा निघाला आहे. परिसरातील झपाट्याने वाढणारी वीजेची मागणी आणि जुनी झालेली वीज वितरण यंत्रणा यामुळे दररोज ४ ते ५ तास वीज खंडित होत होती. मात्र, आमदार महेश लांडगे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ग्रेप्स उपकेंद्र (कळस) येथे १० MVA क्षमतेचे अतिरिक्त रोहित्र बसवण्यात आले असून, कळस उपकेंद्र ते दिघी गावठाण दरम्यान स्वतंत्र वीज वाहिनीचे कामही प्रगतीपथावर आहे.

दिघी येथील गजानन महाराज नगर, पठारे कॉलनी, भारत माता नगर, बी.यु. भंडारी, आदर्शनगर, कमलराज सोसायटी, केशर किंगडम, परांडेनगर, माऊलीनगर या परिसरात रोज सकाळी ७ ते १० या वेळेत अतिभारीमुळे वीज पुरवठा खंडित होत होता. जुन्या यंत्रणांमुळे निर्माण होणारे बिघाड आणि त्यास पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.
या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून आमदार महेश लांडगे यांनी महावितरणच्या मुंबई कार्यालयाशी सतत संपर्क साधत ग्रेप्स उपकेंद्राची क्षमता १० MVA वरून २० MVA पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला. त्यानंतर १० MVA क्षमतेचे नवीन रोहित्र कळस उपकेंद्रात पोहोचले असून, यामुळे आता वीज भाराच्या व्यवस्थापनात सक्षमपणा येणार आहे. शिवाय, दिघी परिसरासाठी स्वतंत्र वीज वाहिनीचे कामही सुरू असून, आगामी १५ दिवसांत सर्व काम पूर्ण होईल. त्यामुळे या भागातील नागरिकांना अखंडित व स्थिर वीज पुरवठा मिळणार आहे.

“दिघी परिसरातील नागरिक गेल्या अनेक महिन्यांपासून वीज समस्यांचा सामना करत होते. ही समस्या फक्त तात्पुरत्या उपायांनी मिटणारी नव्हती, त्यामुळे कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा निर्धार केला. कळस उपकेंद्राची क्षमता वाढवून आणि स्वतंत्र वीज वाहिनी टाकून आता दिघी परिसराला अखंड व स्थिर वीज पुरवठा होईल. महावितरण प्रशासनाने सर्व कार्यवाही प्राधान्याने पूर्ण करावी, अशी अपेक्षा आहे.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.