- दिव्यांग, मतिमंद मुलांच्या पालकांचा, सेवाभाव जपणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव
पुणे, -: “परमेश्वर समाजात दुःख आणि त्यावर फुंकर घालण्याची संस्कृती निर्माण करून समतोल साधतो. एकमेकांना मदतीचा हात देण्याची आपली संस्कृती आहे. संवेदशील वृत्तीने काम करणाऱ्या व्यक्ती, संस्थांमुळेच समाजातील दुःखितांना जगण्यात आनंद मिळण्याची उमेद मिळते,” असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. आनंदाने जगण्यासाठी आर्थिक नव्हे, तर मनाची व दातृत्वाची संपत्ती अधिक गरजेची असते, असेही त्यांनी नमूद केले.

उमेद फाऊंडेशन संचालित दिव्यांग मुले व त्यांच्या पालकांसाठीच्या बालक-पालक प्रकल्पाच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त प्रेरणा पुरस्कार सोहळ्यात चंद्रकांत पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहिल्यानगर येथील स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी होते. न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात आयोजित सोहळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रविंद्र वंजारवाडकर, ज्येष्ठ संघ स्वयंसेवक सुहास हिरेमठ, सामाजिक कार्यकर्त्या सीमा दाबके, उमेद फाऊंडेशनचे राकेश सणस, लीना देवरे, प्रकाश पारखी, प्रतिभा केंजळे आदी उपस्थित होते.
दिव्यांग, मतिमंद पाल्याना मोठ्या मेहतीने घडवणाऱ्या डॉ. रितेश व उल्का नेहेते (पुणे), चिंतामणी व राजेश्वरी राशीनकर (पुणे), अभिमन्यू पोटे (कोल्हापूर), अमृता भिडे (रत्नागिरी) या पालकांना ‘प्रेरणा पुरस्कार’, तर वैद्यकिय सेवेत योगदानाबद्दल डॉ. प्रदीप देशपांडे, इमारत उभारणीत योगदानाबद्दल शशिकांत नागरे, उमेद फाऊंडेशनला जागा देणार्या राजेंद्र रसाळ यांना ‘सेवा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. आक्रंदन या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी झाले.

डॉ. गिरीश कुलकर्णी म्हणाले, “समाजावर श्रध्दा ठेवून काम केल्याने स्नेहालयचे काम चांगल्या पद्धतीने पुढे नेता आले. सामाजिक संस्थांच्या पाठीशी उभे राहिले, तर समाजातील अनेक समस्या सोडविण्यासाठी मदत होते. वेदनेशी नाते जोडून घेता यावे. सामाजिक संस्थांना आर्थिक सहयोगाबरोबरच सेवाभावी कार्यकर्त्यांची गरज असते. त्यामुळे ‘उमेद’सारख्या संस्थांना सर्वतोपरी सहयोग देण्याची भावना समाजातील दानशूर, संवेदनशील माणसांनी करायला हवी.”
रवींद्र वंजारवाडकर म्हणाले, “मदतीचा हात देणारी अनेक माणसे समाजात आहेत. सेवा हे आपले कर्तव्य असून, अवतीभवतीच्या सुख-दुःखात प्रत्येकाने सहभागी व्हावे. समाजातील दुःखितांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे काम स्नेहालय, उमेद फाउंडेशनसारख्या संस्था करीत आहेत.”
प्रास्ताविकात राकेश सणस यांनी उमेद फाऊंडेशनच्या बालक-पालक प्रकल्पासहित अन्य उपक्रमांची माहिती दिली. उमा जोशी यांनी सूत्रसंचालन केले. लीना देवरे यांनी आभार मानले. तत्पूर्वी, विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले.