पुणे, – : सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (SSPU), पुणे, आपल्या ६ व्या दीक्षांत समारंभाची अभिमानाने घोषणा करत आहे. हा समारंभ १६ ऑक्टोबर २०२५ (गुरुवार) रोजी, सकाळी १०. ३० वाजता सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी कॅम्पस, पुणे-मुंबई एक्सप्रेसवे, किवळे, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात स्कूल ऑफ डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजी या नव्या विभागाचे उद्घाटन मा. राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री, भारत सरकार यांच्या हस्ते होणार आहे. हा विभाग भारताच्या वाढत्या संरक्षण नवोन्मेष क्षेत्राला पाठबळ देत “आत्मनिर्भर भारत” या संकल्पनेला पुढे नेणारा ठरेल.
या प्रसंगी, विविध कौशल्याधारित आणि व्यावसायिक कार्यक्रमांतून पदवी प्राप्त करणाऱ्या १५३२ विद्यार्थ्यांच्या यशाचा आणि कर्तृत्वाचा गौरव केला जाणार आहे. हा सोहळा विद्यापीठाच्या “इंडस्ट्री-रेडी” व्यावसायिक घडविण्याच्या ध्येयाला अधोरेखित करतो. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारत सरकारचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहणार असून, महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. तसेच मुरलीधर मोहोळ केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री, भारत सरकार; चंद्रकांत पाटील उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री, महाराष्ट्र शासन; मंगल प्रभात लोढा कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोन्मेष मंत्री, महाराष्ट्र शासन; तसेच माधुरी मिसाळ नगरविकास राज्यमंत्री वाहतूक, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास आणि औकाफ, महाराष्ट्र शासन या मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. डॉ. एस. बी. मजुमदार, यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. स्वाती मजुमदार, प्रो-चान्सलर सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी यांच्या सहकार्याने हा समारंभ पार पडणार आहे.
या वर्षीचा पदवीदान समारंभ विशेष महत्त्वाचा आहे, कारण सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने सलग दुसऱ्या वर्षी एन. आय. आर. एफ. (NIRF) क्रमवारीत भारतातील कौशल्याधारित उच्च शिक्षण क्षेत्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे, ज्यामुळे विद्यापीठाची नेतृत्वाची भूमिका अधिक दृढ झाली आहे. तसेच एसएसपीयूने आंतरराष्ट्रीय सहकार्यांतर्गत वॉर-विक कम्युनिटी कॉलेज (अमेरिका) यांच्याशी भागीदारी केली असून, ॲलेन विद्यापीठ (जर्मनी) सोबत विद्यार्थ्यांच्या अदलाबदलीचा करार केला आहे.
या प्रसंगी बोलताना प्रो-चान्सलर डॉ. स्वाती मजुमदार म्हणाल्या,
“हा पदवीदान समारंभ केवळ आमच्या पदवीधरांच्या यशाचा उत्सव नाही, तर विद्यापीठाच्या प्रगतीतील एक अभिमानाचा क्षण आहे. सिंबायोसिस स्किल्स युनिव्हर्सिटीने भारताच्या ‘स्किल इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या दृष्टीकोनाला मूर्त रूप दिले आहे. आमचे १५३२ पदवीधर हे कौशल्य, नवोन्मेष आणि रोजगारक्षमतेच्या समन्वयातून उभ्या राहिलेल्या शिक्षणमॉडेलचे यश दर्शवतात.”
समारंभात विद्यार्थ्यांना पदव्या, चान्सलरचा सुवर्णपदक पुरस्कार, आत्मनिर्भर पुरस्कार आणि कुशल पुरस्कार प्रदान करण्यात येतील. सर्व पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते दिले जातील.