वालचंदनगर- विश्वासराव रणसिंग महाविद्यालय, कळंब (वालचंदनगर) येथील मानसशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने *‘जागतिक मानसिक आरोग्य दिना’*निमित्त एक दिवसीय कार्यशाळा व पोस्टर प्रेझेंटेशनचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव माननीय वीरसिंह रणसिंग उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचा शुभारंभ झाला.
कार्यशाळेचे प्रास्ताविक प्राध्यापक राजेंद्रकुमार डांगे यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात मानसिक आरोग्याची जाणीव करून देणे, सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे, मनोधैर्य वृद्धिंगत करणे, विद्यार्थ्यांत आत्मसन्मान वाढवणे, न्यूनगंड कमी करणे आणि मोबाईलच्या अतिरेक वापराचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम समजावून सांगणे हे या कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगितले.

कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात बारामती येथील डॉ. अपर्णा पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी “स्वत्वाची जाणीव, ताणतणावाचे मूळ कारण, भावनांवर नियंत्रण, पुस्तकाशी मैत्री आणि ‘म्युझिक थेरपी’चा उपयोग” या विषयांवर प्रभावी भाषण दिले.
दुसऱ्या सत्रात समुपदेशक सोनाली खाडे यांनी “विचारांची निर्मिती, नकारात्मकतेवर मात आणि स्वतःचा शोध” या विषयांवर विद्यार्थ्यांना संवादात्मक मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “आपले शरीर, मन आणि विचार यांच्यातील समतोल राखल्यास आनंदी आणि निरोगी जीवन शक्य आहे.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे होते. त्यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम अधिक अर्थपूर्ण झाला.
या कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. काजल राजे भोसले यांनी केले, तर वक्त्यांचा परिचय प्रा. डॉ. अमित शेटे यांनी करून दिला.
आभार प्रदर्शन प्रा. सोमनाथ चव्हाण यांनी मानले.