पुणे,- यूकेमधील ऑटर कंट्रोल्स लिमिटेडसोबतचा संयुक्त उपक्रम असलेल्या ऑटर कंट्रोल्स इंडियाने आज चाकण-पुणे भागातील आपल्या चौथ्या अत्याधुनिक उत्पादन सुविधेचे उद्घाटन केले. या नवीन उत्पादन सुविधेतून कंपनीच्या भारतातील उत्पादनासाठी लक्षणीय कटिबद्धतेचे प्रदर्शन होत असून यामध्ये एकूण ४५ लाख डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली आहे. ब्रिटिश ट्रेड ऑफिस-पुणे येथील व्यवसाय आणि व्यापार विभागासाठी फ्युचर मोबिलिटी डिपार्टमेंटचे प्रमुख श्री. अवनीश मल्होत्रा यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले.
या नवीन सुविधेमुळे कंपनी तिच्या कामकाजात लक्षणीय वाढ करण्यासाठी सज्ज असून त्यामुळे तिची एकूण उत्पादन क्षमता ७५ टक्क्याने वाढेल आणि चाकण-पुणे औद्योगिक केंद्रात १००० नवीन नोकऱ्या निर्माण होतील.
हा नवीन प्लांट ९६,००० चौरस फूट जागेवर व्यापलेला असून ‘मेक इन इंडिया’ तत्वज्ञानाशी सुसंगत राहून स्थानिक पुरवठा साखळी मजबूत करण्याच्या ऑटर कंट्रोल्स इंडियाच्या धोरणाच्या तो केंद्रस्थानी आहे. या उपक्रमाअंतर्गत कंपनीला यापूर्वी राष्ट्रीय उत्पादकता आणि नवोन्मेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
ऑटर कंट्रोल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. उल्हास के. जोशी म्हणाले, “भारतीय उत्पादन क्षेत्राच्या लवचिकता आणि क्षमतेवरील आमच्या विश्वासाचे खरे प्रतिबिंब या नवीन उत्पादन सुविधेमध्ये पडले आहे. पुण्यात वाढीव क्षमतेसाठी गुंतवणूक करून आणि १००० नवीन रोजगार निर्माण करून, आम्ही केवळ आमचा व्यवसाय वाढवत नाही आहोत, तर आम्ही समुदायात गुंतवणूक करत आहोत. अधिक मजबूत, स्वावलंबी देशांतर्गत पुरवठा साखळी तयार करण्यास आम्ही मदत करत आहोत.”
ही ९६,००० चौरस फुटांवर पसरलेली सुविधा आयएसओ ८ / क्लास १००,००० क्लीन रूम सुविधेसह प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. या तांत्रिक प्रगतीमुळे कंपनीला ऑटोमोटिव्ह आणि नॉन-ऑटोमोटिव्ह अशा दोन्ही क्षेत्रांसाठी अत्यंत विशिष्ट अशा ईएमएस आणि एसएमटी व्हर्टिकलमध्ये (इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस आणि सरफेस माउंट टेक्नॉलॉजी) प्रवेश करणे शक्य होईल. या नवीन सुविधेमुळे लिक्विड सिलिकॉन रबर (एलएसआर) मोल्डेड घटक आणि निश वायर हार्नेस यांसारख्या उच्च काटेकोरपणा असलेल्या उत्पादनांना समृद्ध करण्यामध्येही हातभार लागेल.
ऑटर ग्रुपचे अध्यक्ष डॉ. डेव्हिड स्मिथ आणि ऑटर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ श्री. अॅलेक्स निजॉफ उद्घाटनप्रसंगी भाष्य करताना म्हणाले. “पुण्यातील ही गुंतवणूक जागतिक ऑटर ग्रुपसाठी एक महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय आहे. जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणि गुणवत्ता प्रदान करणे आणि आमच्या प्रक्रियांना आघाडीच्या आंतरराष्ट्रीय मानकांशी सुसंगत करणे यासाठी आमची कटिबद्धता त्यातून अधोरेखित झाली आहे. या सुविधेच्या उद्घाटनामुळे, विशेषतः संरक्षण क्षेत्रांसाठी ईएमएस मॅन्युफॅक्चरिंग आणि रिले मॅन्युफॅक्चरिंग यांसारख्या पुढील पिढीच्या उत्पादनांचा विकास करण्याच्या क्षमतेमुळे, आशिया-पॅसिफिक प्रदेशात भविष्यासाठी तयार अभियांत्रिकी भागीदार म्हणून आमचे स्थान मजबूत होणार आहे.”
ईएमएस मॅन्युफॅक्चरिंग, इन-हाऊस कमर्शियल स्टॅम्पिंग, रेल्वे स्विचगियर्स आणि रिले मॅन्युफॅक्चरिंग यांवर कंपनीचा भविष्यात भर असेल.