पुणे – महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाबद्दल आधीपासूनच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नव्या पोस्टरमुळे या उत्सुकतेला आणखीनच उधाण आलं आहे.
लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याचा या चित्रपटातील लूक उलगडण्यात आला असून, त्याचा हा अवतार अक्षरशः काळजात धडकी भरवणारा आहे! चेहऱ्यावर रक्त, व्रण, आणि नजरेत दडलेला क्रौर्याचा दरारा पाहून प्रेक्षक थक्क झाले आहेत.
या भूमिकेबद्दल बोलताना सिद्धार्थ जाधव म्हणतो,
ही भूमिका माझ्या कारकिर्दीतील सगळ्यात वेगळी आहे. या पात्रातील क्रौर्य लूकमधून उतरवणं हेच आव्हान होतं. माझा हा लूक पाहून मी स्वतःच थक्क झालो. महेश सरांनी तयार केलेला हा अवतार प्रेक्षकांना नक्कीच हादरवेल.”
द ग्रेट मराठा एन्टरटेनमेंट, सत्य-सई फिल्म्स आणि क्रिझोल्ह यांच्या निर्मितीत तयार झालेला हा ऐतिहासिक चित्रपट झी स्टुडिओजच्या माध्यमातून ३१ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात सिद्धार्थ बोडके छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत असून, विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, सयाजी शिंदे आणि इतर दिग्गज कलाकार झळकणार आहेत. तसेच बालकलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्या भूमिकाही महत्त्वाच्या आहेत.
महेश मांजरेकर यांच्या कथा-पटकथेवर आधारित आणि सिद्धार्थ साळवी लिखित संवादांनी सजलेला ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ प्रेक्षकांना एका नव्या ऐतिहासिक प्रवासाची अनुभूती देणार आहे!