.
पंढरपूर – दरवर्षी कार्तिकी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, यात्रा कालावधीत चांगला मुहुर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना 24 तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते. यावर्षी दिनांक 26 ऑक्टोंबर रोजी चांगला दिवस असल्याने विधिवत पुजा करून श्रींचा पलंग काढण्यात आला आहे. विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड; तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी तक्क्या देण्यात आला आहे. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे 24 तास दर्शन सुरू राहणार असल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगीतले.

श्रींचा पलंग काढल्याने काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती आदी राजोपचार बंद होवून नित्यपुजा, महानैवेद्य व गंधाक्षता हे राजोपचार सुरू राहतील. दिनांक 09 नोव्हेंबर (प्रक्षाळपुजा) पर्यंत 24 तास दर्शन उपलब्ध असणार आहे. श्रींचा पलंग काढताना पुजेवेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य शकुंतलाताई नडगिरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगावकर), ॲड माधवीताई निगडे , कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्र. व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत, लेखा अधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख संजय कोकीळ, अतुल बक्षी व पौरोहित्य करणारे कर्मचारी उपस्थित होते.

दर्शनरांगेत मोठ्या प्रमाणात भाविक आहेत, या भाविकांचे लवकरात लवकर दर्शन होण्यासाठी दर्शनरांग जलद व द्रुतगतीने चालविणेकामी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. पंरपंरेनुसार श्रींचा पलंग काढल्याने दैनंदिन 24 तास मुखदर्शन व 22.15 तास पदस्पर्शदर्शन उपलब्ध होत आहे. याशिवाय, मंदिर समितीच्या संकेतस्थळावरून व जागोजागी एलईडी टिव्हीद्वारे लाईव्ह दर्शन उपलब्ध करून देण्यात येत आहे. संपूर्ण यात्रा कालावधीत भाविकांच्या हस्ते होणा-या पुजा व व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात आलेले आहे. तसेच या यात्रा कालावधीतील श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिराशी संबंधित असलेल्या प्रथा व परंपरांचे कटाक्षपणे पालन करण्यात येत असून, श्रींचा पलंग काढणे, एकादशीच्या सर्व पुजा, महानैवेद्य, श्रींच्या पादुकांची मिरवणूक, महाद्वार काला, प्रक्षाळपुजेचे योग्य ते नियोजन करण्यात आल्याचे यावेळी कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगीतले.

मागील आषाढी यात्रेदरम्यान भाविकांच्या गर्दीचा अनुभव लक्षात घेऊन, यंदाच्या कार्तिकी यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. दर्शन रांगेच्या व्यवस्थेवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले असून भाविकांना सुलभ, सुव्यवस्थित आणि जलद दर्शनाची सुविधा मिळावी यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.
राजेंद्र शेळके.(कार्यकारी अधिकारी)


