पुणे – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर जाहीर झाल्या असून, महाराष्ट्रातील मतदारांनी ज्याची महिनोनमहिने प्रतीक्षा केली होती, त्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा आज राज्य निवडणूक आयोगाने केली. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत या निवडणुकांचा पहिला टप्पा जाहीर करण्यात आला.
पहिल्या टप्प्यात राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार आहेत, तर दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
आयोगाने प्रसिद्ध केलेल्या कार्यक्रमानुसार, २ डिसेंबर २०२५ रोजी राज्यभरात मतदान होईल, तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडेल. १० डिसेंबर रोजी अधिकृत निकाल जाहीर केले जाणार आहेत.
📅 निवडणूक कार्यक्रम (महत्वाच्या तारखा):
- अर्ज दाखल करण्यास सुरुवात – १० नोव्हेंबर २०२५
- अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत – १७ नोव्हेंबर २०२५
- अर्जांची छाननी – १८ नोव्हेंबर २०२५
- अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत – २१ नोव्हेंबर २०२५
- आक्षेप असलेल्या ठिकाणी अंतिम मुदत – २५ नोव्हेंबर २०२५
- निवडणूक चिन्ह व उमेदवारांची अंतिम यादी – २६ नोव्हेंबर २०२५
- मतदान – २ डिसेंबर २०२५
- मतमोजणी – ३ डिसेंबर २०२५
- निकाल जाहीर – १० डिसेंबर २०२५
🧾 नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकीचा आकडा:
राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका यंदा पार पडणार आहेत. या निवडणुकांमधून ६,८४९ सदस्य आणि २८८ अध्यक्ष निवडले जाणार आहेत.
यामध्ये १० नव्या नगरपरिषदांचा समावेश असून, २३६ नगरपरिषदांची मुदत संपलेली आहे. तसेच राज्यातील ४७ नगरपंचायतींपैकी ४२ नगरपंचायतींसाठी यंदा निवडणूक होणार आहे. त्यापैकी २७ नगरपंचायतींची मुदत संपली असून, १५ नव्या नगरपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे पुन्हा एकदा राजकीय तापमान वाढण्याची शक्यता असून, सर्व प्रमुख पक्षांनी तयारीला वेग दिला आहे.


