Nagarparishad-Nagarpanchayat Election 2025 | मुंबई – राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आजपासून (१० नोव्हेंबर) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. यानंतर राज्यभरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
प्रत्येक पक्षाकडून उमेदवारांच्या मुलाखती आणि चर्चांना सुरुवात झाली असून, महायुती आणि महाविकास आघाडीत मात्र राज्यस्तरीय चर्चांचे पडदे (Nagarpanchayat Election)अद्याप उघडलेले नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी स्थानिक आघाड्यांवर भर दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या निवडणुकीत एकूण २८८ अध्यक्ष आणि ६,८५९ सदस्यांची निवड होणार आहे. मतदान २ डिसेंबर २०२५ रोजी होईल आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत १७ नोव्हेंबरपर्यंत असणार असून, १८ नोव्हेंबर रोजी छाननी होईल. तर उमेदवारांना २१ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची संधी मिळणार आहे.
यंदा निवडणुकीसाठी ऑनलाइन(online) पद्धतीने अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करावा लागणार आहे.
राज्यातील एकूण २४७ नगरपरिषदेपैकी
- ३३ पदे अनुसूचित जातींसाठी,
- ११ पदे अनुसूचित जमातींसाठी,
- ६७ पदे मागासवर्गासाठी,
तर १३६ पदे खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.
राज्यभरात उमेदवारांची चढाओढ, पक्षीय रणनीती आणि स्थानिक पातळीवरील समीकरणे यामुळे या निवडणुकीत रंगतदार वातावरण निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.


