26.1 C
New Delhi
Thursday, November 20, 2025
HomeTop Five Newsगोव्यात जागतिक मराठी संमेलन

गोव्यात जागतिक मराठी संमेलन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती


अनिल खवटे आणि महेश मांजरेकर यांना मानाचे पुरस्कार

पणजी (गोवा) येथे ९ ते ११ जानेवारी २०२६ दरम्यान जागतिक मराठी अकादमी आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ या भव्य जागतिक संमेलनाचे उद्घाटन दि. ९ जानेवारी रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न होईल. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून, ‘पद्मविभूषण’ डॉ. अनिल काकोडकर हे संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.

या जागतिक मराठी संमेलनात दिले जाणारे मानाचे पुरस्कार यंदा गोव्याच्या उद्योगक्षेत्रातील दिग्गज श्री. अनिल खवटे यांना ‘जागतिक मराठी भूषण पुरस्कार’, तर चित्रपटसृष्टीतील मान्यवर दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते श्री. महेश मांजरेकर यांना ‘मराठी जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि गोव्याचे मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात येतील. संमेलनाचे कार्याध्यक्ष दशरथ परब व सहकारी अनिल सामंत, रमेश वंसकर संमेलनाच्या आयोजनाची उत्तम तयारी करत आहेत. असे जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितले. याप्रंसंगी अकादमी सदस्य संजय ढेरे, कार्यकारिणी सदस्य महेश म्हात्रे (मुंबई) व संमेलन कार्यवाह गौरव फुटाणे उपस्थित होते.

जागतिक मराठी अकादमीतर्फे दिले जाणारे हे मानाचे सन्मान उद्योग, संस्कृती व कलाक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाला दिलेली संस्थात्मक दाद आहे. श्री. अनिल खवटे यांची उद्यमशीलता आणि सामाजिक बांधिलकी, तसेच श्री. महेश मांजरेकर यांच्या कलात्मक संवेदना आणि प्रयोगशील दिग्दर्शनाने मराठी विश्व समृद्ध झाले आहे. ख्यातनाम अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरणार्‍या ‘शोध मराठी मनाचा’ या संमेलनात जगभरातील कर्तबगार मराठी बांधवांच्या उपस्थितीत या दोन्ही मान्यवरांचा गौरव करण्याचा सन्मान अकादमीला लाभत आहे, याबद्दल रामदास फुटाणे यांनी आनंद व्यक्त केला.

या तीन दिवसांच्या संमेलनात कर्तबगार मराठी व्यक्तिमत्त्वांचा सन्मान केला जाणार आहे. त्यांच्या मुलाखती घेऊन, त्यांचा जीवनप्रवास समजून घेतला जाईल. याशिवाय, गोव्यातील स्थानिक कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम देखील होतील.

अनिल खवटे

गोव्याचे ख्यातनाम उद्योगपती श्री. अनिल खवटे यांनी सिव्हिल इंजिनिअर म्हणून करिअरची सुरुवात करून अल्कॉन एंटरप्रायझेसच्या माध्यमातून बहुविध उद्योगसमूह उभारला. १९७० च्या दशकात लघुउद्योगातून झालेली त्यांची वाटचाल बांधकाम, रिअल इस्टेट, हॉस्पिटॅलिटी, सिमेंट, ऑटोमोबाईल्स, लॉजिस्टिक्स आणि तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांत यशस्वीपणे विस्तारली. त्यांच्या नेतृत्वाखाली हॉटेल डेल्मन, हॉटेल रोनिल (Hyatt JdV), अल्कॉन सिमेंट, रेडिमिक्स काँक्रीट, Hyundai व Mercedes-Benz डीलरशिप, मायक्रोफाईन प्रॉडक्ट्स आणि अल्कोलॅब यांसह अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प साकारले गेले. उद्योग क्षेत्राबरोबरच शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान असून मुश्तिफुंड संस्था, दिशा चॅरिटेबल ट्रस्ट आणि विद्या विकास मंडळ अशा संस्थांतून ते सक्रिय आहेत. उद्योग रत्न, राजीव गांधी एक्सलन्स पुरस्कार, प्राईड ऑफ गोवा, गोअन ऑफ द इयर तसेच पोर्तुगाल राष्ट्राध्यक्षांचा “कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ मेरिट” यांसारख्या राष्ट्रीय–आंतरराष्ट्रीय सन्मानांनी त्यांचा गौरव झाला आहे.
महेश मांजरेकर

चित्रपटसृष्टीतील दमदार आणि बहुमुखी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे श्री. महेश मांजरेकर यांनी रंगभूमीपासून सुरुवात करत मराठी आणि हिंदी या दोन्ही चित्रपटसृष्टीत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. अस्तित्व, वास्तव, नटसम्राट, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, सिटी ऑफ गोल्ड, तसेच काँटे, कुरुक्षेत्र आणि दबंग ३ यांसारख्या चित्रपटांत त्यांनी दिग्दर्शन, अभिनय आणि निर्मितीच्या क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केली आहे. ओटीटी माध्यमातील त्यांच्या निर्मिती व दिग्दर्शनालाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. सामाजिक वास्तव, तीक्ष्ण निरीक्षण, संवेदनशील मांडणी आणि प्रभावी कथनशैली ही त्यांची वैशिष्ट्ये मानली जातात. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअर, महाराष्ट्र राज्य पुरस्कार व झी गौरव यांसह अनेक मान्यताप्राप्त पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
26.1 ° C
26.1 °
26.1 °
38 %
2.1kmh
0 %
Thu
26 °
Fri
27 °
Sat
27 °
Sun
26 °
Mon
26 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!