लोहगाव : त्रिमूर्ती लॉन्स येथे श्री बालाजी फाउंडेशन यांच्या वतीने महिलांसाठी स्तन कर्करोग व गर्भाशय मुखाचा कर्करोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढविणे आणि कर्करोगाचे लवकर निदान करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या शिबिराला परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला.
शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मा. ज्योतीताई सावर्डेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष डॉ. मानसिंग साबळे, श्री बालाजी फाउंडेशनचे डॉ. मयूर खाडे, श्री संतोष कुंभार तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

या शिबिरामध्ये सुमारे 480 महिलांची तपासणी करण्यात आली. वाघोलीतील इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेंटरमधील तज्ज्ञ डॉक्टर आणि कर्मचारी यांनी महिलांची सविस्तर आरोग्य तपासणी केली.
शिबिरात
- वैद्यकीय तपासणी
- ब्रेस्ट थर्मल स्क्रीनिंग
- पॅप–स्मिअर तपासणी
यांसह रक्ताच्या सर्व प्रकारच्या चाचण्या मोफत करण्यात आल्या.
तपासणीदरम्यान डॉ. मानसिंग साबळे यांनी स्तन कर्करोग आणि गर्भाशय मुखाचा कर्करोग या विषयांवर महिलांना सखोल मार्गदर्शन केले. नियमित तपासणीचे महत्त्व, लक्षणे, लवकर निदानाचे फायदे आणि उपचारप्रक्रियेबाबत त्यांनी महिलांमध्ये जागरूकता निर्माण केली.

डॉ. साबळे म्हणाले,
“शहरी आणि ग्रामीण भागातील महिलांनी स्वतः पुढाकार घेऊन कॅन्सर तपासणी शिबिरांचा लाभ घ्यावा. तसेच जवळच्या सरकारी रुग्णालयातही वेळेवर तपासणी करून घेणे अत्यावश्यक आहे. कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, लवकर निदान झाले तर उपचार अधिक परिणामकारक ठरतात आणि आजार गंभीर होण्यापासून बचाव होतो.”
महिलांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम राबवणाऱ्या श्री बालाजी फाउंडेशनने आतापर्यंत शहर आणि ग्रामीण भागात अनेक ब्रेस्ट कॅन्सर, सर्व्हायकल कॅन्सर व ओरल कॅन्सर तपासणी शिबिरांचे आयोजन केले आहे. यासोबतच कॅन्सर जनजागृतीसाठी शाळा, महाविद्यालये, महिला बचत गट आणि विविध सामाजिक मंचांवर व्याख्यानेही आयोजित करण्यात आली आहेत.
महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्यासाठीचे संस्थेचे कार्य उल्लेखनीय आणि दिशादर्शक असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.


