पुणे : तब्बल आठशेहून अधिक नामांकित प्रकाशकांचे स्टॉल असलेला मंडपासह, बालगोपाळांच्या कला-सृजनशीलतेला चालना देणारा ‘चिल्ड्रेन कॉर्नर’, उद्घाटन-समारोप सत्रासह दर्जेदार साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रम-सोहळ्यांसाठीचे मोठे व्यासपीठ, पुणे पुस्तक महोत्सवाच्या बोधचिन्हाच्या स्वरुपातील उत्तुंग प्रवेशद्वार, चमचमीत खाद्यपदार्थांचा आस्वाद देण्यासाठी ‘फूड कोर्ट’… सर्वांत मोठा वाचनोत्सव असलेल्या पुणे पुस्तक महोत्सवासाठी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर भल्यामोठ्या मांडवांच्या उभारणीची कामे अतिशय वेगात सुरू आहेत.

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने येत्या १३ ते २१ डिसेंबर कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील साहित्यप्रेमींच्या आवडत्या पुणे पुस्तक महोत्सवाचे हे तिसरे वर्ष आहे. अमाप वाचकप्रियतेची पावती मिळविलेल्या या महोत्सवात देशभरातील नावाजलेले प्रकाशक सहभागी होणार आहेत. आतापर्यंत आठशेहून अधिक स्टॉलचे बुकिंग झाले आहे. प्रकाशकांच्या स्टॉलसाठी ऐसपैस मांडव उभारण्यात येत आहे. १२ डिसेंबर रोजी संगणाकाधारित लॉटरी पद्धतीने प्रकाशकांना स्टॉलचे वाटप केले जाणार आहे. या स्टॉलचे कलर कोडिंग करण्यात येणार असून, प्रवेशद्वारावर त्याची माहिती वाचकांकरिता उपलब्ध करून दिली जाणार आहे. मांडवात इंटरनेट-वायफायची सुविधा, आसनव्यवस्था, पिण्यासाठी पाणी, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, पुस्तकांची प्रकाशने व लेखक-वाचक संवादासाठी जागा आदी सुविधाही उपलब्ध असणार आहेत.

पुण्यनगरीचा मानबिंदू असलेल्या शनिवार वाड्याचे प्रवेशद्वार आणि पुण्याच्या वाचन संस्कृतीची ओळख दर्शविणारे पुस्तकरुपी बुरुज असे पुणे पुस्तक महोत्सवाचे बोधचिन्ह भव्य-दिव्य प्रवेशद्वाराच्या स्वरुपात साकारण्यात येत आहे. पुणे पुस्तक महोत्सवात बालगोपाळांचा वाढता सहभाग लक्षात घेत ‘चिल्ड्रेन कॉर्नर’ दालनासाठी प्रशस्त जागा राखून ठेवण्यात आली आहे. या दालनात बालचमूंसाठी चित्रकला, शिल्पकला, लेखन-अभिनय अशा विविध कला-साहित्य-संस्कृती-अध्ययनाचे धडे देणाऱ्या कार्यशाळा रंगणार आहेत. ‘पुणे लिट फेस्ट’ची पर्वणी यंदा अॅम्फी थिएटरमध्ये सहा दिवस साहित्यप्रेमींना अनुभवता येणार आहे. पेटपूजेसाठी ‘फूड कोर्ट’मध्ये वीसहून अधिक खाद्यपदार्थांचे स्टॉल असून, तिथे चमचमीत खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतानाच सुरेल ‘लाइव्ह म्युझिक’ देखील ऐकता येणार आहे. महोत्सवात येणाऱ्या वाचकांच्या वाहनांकरिता मोठ्या प्रमाणात पार्किंगची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. वाचकांना कोणताही त्रास न होता साहित्य-संस्कृतीचा आनंद घेता येईल, असे नियोजन केले जात असल्याचे पुणे पुस्तक महोत्सव संयोजन समितीकडून सांगण्यात आले.
महोत्सवात होणार पुस्तकांची प्रकाशने
पुणे पुस्तक महोत्सवाच्या संयोजन समितीने महोत्सवात सहभागी प्रकाशकांची शुक्रवारी बैठक घेतली. या महोत्सवात व्यावसायिक म्हणून सहभागी होतानाच सामाजिक भान जपण्याचे आवाहन महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी प्रकाशकांना केले. ‘एनबीटी’चे अध्यक्ष मिलिंद मराठे, संयोजिका बागेश्री मंठाळकर, ज्येष्ठ पत्रकार अभय कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही महोत्सवात पुस्तके-ग्रंथांची प्रकाशने करण्यात येणार आहेत. त्यासाठी इच्छुकांनी आठ डिसेंबरपर्यंत पुस्तक-ग्रंथाच्या दोन प्रती महोत्सवाच्या कार्यालयात जमा कराव्यात. एका उपसमितीमार्फत या पुस्तक-ग्रंथाचे परीक्षण केल्यानंतरच तिची प्रकाशनासाठी निवड होणार आहे, अशा सूचना या वेळी देण्यात आल्या.


