15.1 C
New Delhi
Wednesday, December 17, 2025
HomeTop Five Newsपुण्याला पुस्तकाची जागतिक राजधानी करणार-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुण्याला पुस्तकाची जागतिक राजधानी करणार-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

फर्ग्युसन महाविद्यालय येथे १३ ते २१ डिसेंबरदरम्यान आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन

पुणे महोत्सव खऱ्या अर्थाने भारतीय विचार, संवाद आणि संस्कृतीचा महोत्सव-केंद्रीय सहकार राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ

पुणे, -: पुणे पुस्तक महोत्सवाला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता येत्या काळात पुणे ही पुस्तकाची राजधानी करण्यासाठी प्रयत्न करणार असून पुढील वर्षी हा महोत्सव जागतिक पुस्तक महोत्सव म्हणून आयोजित करण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

नॅशनल बुक ट्रस्टच्यावतीने फर्ग्युसन महाविद्यालय येथे आयोजित तिसऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सहकार राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु सुरेश गोसावी, ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लेखक विश्वास पाटील, नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष मिलिंद मराठे, ,पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद रावत, पुस्तक महोत्सव संयोजन समितीचे सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.

पहिल्या पुस्तक महोत्सवात सुमारे ११ कोटी रुपये, दुसऱ्या वर्षी ४० कोटी रुपयांची पुस्तक विक्रीद्वारे या पुस्तक महोत्सवाला प्रतिसाद वाढत असल्याचे सांगून श्री. पाटील म्हणाले, जगाची पुस्तकाची राजधानी पुणे व्हावी, याकरिता या वर्षीच्या जागतिक पातळीवर होणाऱ्या पुस्तकासंबंधित उपक्रमात पुणे पुस्तक महोत्सवाने सहभाग घेतला आहे. या उपक्रमाचे युनेस्कोमार्फत मूल्यमापन करण्यात येत आहे, त्यामुळे जागतिक पुस्तकाची राजधानी पुणे व्हावी याकरिता अधिकाधिक नागरिकांनी या महोत्सवाला भेट द्यावी. असे झाल्यास पुढच्या वर्षी पुणे पुस्तक महोत्सव हा जागतिक पुस्तक महोत्सव म्हणून आयोजन करण्यात येईल, या माध्यमातून जागतिक पातळीवरील प्रकाशक, लेखक या ठिकाणी येतील.

पुस्तक वाचनाचा आनंद मोठा असतो त्यामुळे ई-बुकच्या युगात पुस्तकाचे वाचन सुरुच राहील. मातृभाषा मराठी भाषेचा अभिमान वाटेल अशी भाषा आहे, देशात सुमारे १२ कोटी मराठी भाषिक आहेत, अशा मराठी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी मराठी नाटक व चित्रपट पहावेत, साहित्याचे वाचन करावे, गीत ऐकावे, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले.

श्री. मोहोळ म्हणाले, पुणे पुस्तक महोत्सवाला मागील दोन वर्षात वाचकांची मोठया प्रमाणात उपस्थिती, पुस्तकाची विक्रमी विक्री, साहित्य महोत्सवाच्या माध्यमातून विद्वतापूर्ण आणि वैचारिक मंथन घडवून आणणाऱ्या चर्चासत्राचे आयोजन तसेच विविध जागतिक विक्रम झाले असल्याने हा महोत्सव पुस्तक खरेदीचा महोत्सव न राहता खऱ्या अर्थाने भारतीय विचार, संवाद आणि संस्कृतीचा महोत्सव म्हणून ओळखला जात आहे.

ते पुढे म्हणाले, येथे देश विदेशातील विविध भाषेतील पुस्तके उपलब्ध आहेत, याचाच अर्थ पुणे हे साहित्य, कला, संस्कृती याच मानबिंदू असलेले शहर म्हणून ओळख आहे. या महोत्सवाकडे वाचन संस्कृतीला समृद्ध करण्याचे व्यासपीठ म्हणून बघितले जात असून पुणेकरांच्या मनात या महोत्सवाबद्दल आपुलकी निर्माण झाली आहे. अभिजात मराठी भाषासह सर्व भारतीय भाषेचे संवर्धन, नवोदित लेखकांना व्यासपीठ तसेच सर्व वयोगटात वाचन संस्कृती रुजविण्याचे काम या महोत्सवाने केले आहे. पुणे शहर हे ज्ञानाची, विचाराची आणि सांस्कृतिक परंपरेची नगरी असून या परंपरेला साजेसा वाचन महोत्सव पुणेकरांनी मनापासून स्वीकारला आहे, असेही ते म्हणाले.

या महोत्सवाच्या माध्यमातून भारतीय भाषेचे अनुवाद, साहित्यिकांच्या विचाराचे आदानप्रदान चालना, वैविध्यपूर्ण भारतीय साहित्य, संस्कृती आंतरराष्ट्रीय वाचकांपर्यंत पोहोचविण्यास मदत होईल, येत्या काळात पुण्याला पुस्तकाची राजधानीचा दर्जा मिळण्यास मदत होईल तसेच दिल्ली येथे आयोजित आंतरराष्ट्रीय पुस्तक महोत्सवाच्या धर्तीवर पुढच्या वर्षी पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन होईल, अशा विश्वास श्री. मोहोळ यांनी व्यक्त केला.

विश्वास पाटील म्हणाले, दिल्ली आणि कलकत्ता येथील पुस्तक महोत्सवाप्रमाणे पुणे पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. हा भव्य महोत्सव आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन करुन येत्या काळात पुणे ही पुस्तकाची राजधानी होण्यास मदत होईल, असेही श्री. पाटील म्हणाले.

पुणे पुस्तक महोत्सवामध्ये सुमारे ७५० हून अधिक पुस्तकाचे दालन आहेत. पुणे साहित्य महोत्सवात साहित्यक, कलाकार आदी सहभागी होणार आहेt असे सांगून श्री. मराठे म्हणाले, पुणे पुस्तक महोत्सवाच्या धर्तीवर उपराजधानी नागपूर येथे पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आला. येत्या काळात गोवा येथे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. वाचन संस्कृतीची चळवळ अशीच अखंडपणे पुढे चालत राहावी याकरीता प्रयत्न करणार आहोत. असेही ते म्हणाले.

श्री. पांडे म्हणाले, पुणे पुस्तक महोत्सवाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता हा ‘पुणेकरांचा उत्सव’ झालेला आहे. पुणे ही सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते; परंतु पुढच्या वर्षी पुणे ही पुस्तकाची जागतिक राजधानी म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. पुणे साहित्य महोत्सवाचे १६ डिसेंबर पासून आयोजन करण्यात येणार असून सुमारे १५० हून अधिक नामवंत व्यक्ती सहभागी होणार आहेत, असेही श्री. पांडे म्हणाले.

यावेळी विश्वास पाटील लिखित ‘लस्ट फॉर मुंबई’ या कांदबरीचे अनावरण करण्यात आले.

कार्यक्रमानंतर मान्यवरांनी पुणे पुस्तक महोत्सवातील विविध दालनाला भेट देऊन विविध पुस्तकाविषयी माहिती घेतली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
15.1 ° C
15.1 °
15.1 °
77 %
0kmh
1 %
Wed
20 °
Thu
25 °
Fri
26 °
Sat
25 °
Sun
24 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!