India U19 beat Pakistan U19: अंडर-१९ आशिया चषकात आयुष म्हात्रेच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने पाकिस्तानचा मोठा पराभव केला आहे. भारताने पाकिस्तानवर ९० धावांवर दणदणीत विजय मिळवला. वैभव सूर्यवंशी स्वस्तात बाद झाल्यानंतरही भारताच्या इतर फलंदाजांनी संघाचा डाव सावरला. तर गोलंदाजीत टीम इंडियाच्या गोलंदाजांना शानदार कामगिरी करत १५० धावांवर पाकिस्तानला सर्वबाद केलं.
भारताने प्रथम फलंदाजी करताना २४० धावा केल्या. भारताचा स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशी दुबईच्या खेळपट्टीवर फक्त ५ धावा करू शकला. कर्णधार आयुष म्हात्रे देखील ३८ धावांवर बाद झाला, पण भारताचे तीन खेळाडू भारताच्या विजयाचे हिरो ठरले. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना ४९ षटकांचा करण्यात आला.
भारताच्या विजयात फलंदाज आरोन जॉर्ज, अष्टपैलू कनिष्क चौहान आणि वेगवान गोलंदाज दीपेश देवेंद्रन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आरोन जॉर्जने ८८ चेंडूत ८५ धावा केल्या, तर कनिष्क चौहाननेही ४६ धावा केल्या आणि यासह त्याने ३ विकेट्स घेतल्या. तर वेगवान गोलंदाज दीपेशने १६ धावा देत ३ विकेट्स घेतल्या.
STORIES YOU MAY LIKE
टीम इंडियाने दिलेल्या २४१ धावांच्या लक्ष्याचा पाठला करताना पाकिस्तानची सुरूवात साधारण झाली. पण भारताने उत्कृष्ट गोलंदाजी करत पाकिस्तानच्या धावांवर अंकुश ठेवला. दीपेश देवेंद्रनने संघाला पहिलं यश मिळवून दिलं, त्याने मागील सामन्यात स्फोटक शतक झळकावणाऱ्या समीर मन्हासला ९ धावांवर बाद केलं. अली हसन बलोचला देखील त्यानेच बाद केलं. अहमद हुसेनलाही माघारी धाडलं.
कनिष्क चौहानने उस्मान खानला बाद करून पाकिस्तानला अजून एक धक्का दिला. कर्णधार फरहान युसूफ आणि हुजैफा अहसान यांनी मधल्या षटकांमध्ये चांगली भागीदारी रचली पण वैभव सूर्यवंशीने ही भागीदारी मोडून काढली आणि युसूफला बाद केलं. त्यानंतर कनिष्क चौहानने हुजैफा एहसानला ७० धावांवर बाद करून पाकिस्तानच्या आशा धुळीस मिळवल्या. यासह पाकिस्तानचा डाव ४१.२ षटकांत १५० धावांवर संपला. प्रथम फलंदाजी करताना चौथ्या षटकात सलामीवीर वैभव सूर्यवंशी चौकार मारून बाद झाला. त्यानंतर कर्णधार आयुष म्हात्रे आणि आरोन जॉर्ज यांनी पाकिस्तानवर चांगलंचं आक्रमण केले. आरोन जॉर्ज उत्तम फॉर्ममध्ये होता आणि आयुष म्हात्रे आक्रमक फटकेबाजी करत होता. आयुष म्हात्रे ३ षटकार व ४ चौकारांसह ३८ धावा करत बाद झाला. त्यानंतर विहान मल्होत्रा १२ आणि वेदांत तिवारी फक्त ७ धावांवर बाद झाले. पण आरोन जॉर्ज मात्र एका टोकाकडून पाय घट्ट रोवून उभा होता आणि अर्धशतक झळकावलं.
अष्टपैलू कनिष्क चौहाननेही एक उत्तम खेळी केली, त्याने ४६ चेंडूत ४६ धावा केल्या. पण त्याचं अर्धशतक मात्र हुकलं आणि आरोन जॉर्ज ८५ धावांवर बाद झाल्याने शतक पूर्ण होऊ शकला नाही. पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद सय्यम आणि अब्दुल सुभान यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेत भारताला २४० धावांत सर्वबाद केलं.


