पुणे : पुणे महानगरपालिकेच्या २०२५-२६ या कालावधीतील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, शहरातील ब्राह्मण समाजाच्या संख्याबळाचा विचार करून उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष मंदार रेडे यांनी केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला असून पुणे शहरातील एकूण ४१ प्रभागांमध्ये या निवडणुका होणार आहेत. आरक्षण, सर्वसाधारण व महिला गटांचा विचार करता विविध समाजांच्या मतदारांची भूमिका या निवडणुकांमध्ये निर्णायक ठरणार असल्याचे रेडे यांनी सांगितले.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुणे जिल्ह्यातील २३ शाखांद्वारे सक्रियपणे कार्यरत असून, मोठ्या संख्येने ब्राह्मण मतदार संघटनेशी जोडले गेले आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या सामाजिक संघटनांपैकी एक म्हणून महासंघाची ओळख निर्माण झाली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
महासंघाने केलेल्या अभ्यासानुसार पुणे शहरातील एकूण मतदारांपैकी सुमारे १० ते १२ टक्के मतदार हे ब्राह्मण समाजाचे आहेत. तसेच पुणे शहराच्या सामाजिक, राजकीय व शैक्षणिक विकासात ब्राह्मण समाजातील खासदार, आमदार व माजी नगरसेवकांचे मोलाचे योगदान राहिले आहे.
विशेष म्हणजे, पुणे शहरातील एकूण ४१ प्रभागांपैकी तब्बल २३ प्रभागांमध्ये ब्राह्मण मतदारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे या निवडणुकीत ब्राह्मण समाजाच्या संख्याबळाचा आणि प्रभावाचा विचार करून १५ ते २० ब्राह्मण इच्छुकांना उमेदवारी देण्यात यावी, अशी विनंती मंदार रेडे यांनी पुणे जिल्हाध्यक्ष या नात्याने केली आहे.
या मागणीचा सर्व राजकीय पक्षांचे अध्यक्ष, स्थानिक आमदार, खासदार आणि पक्ष नेतृत्वाने गांभीर्याने विचार करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. ब्राह्मण समाजाच्या अपेक्षा लक्षात घेऊन योग्य प्रतिनिधित्व दिल्यास निवडणुकांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येतील, असा विश्वासही रेडे यांनी व्यक्त केला आहे.


