पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी सादर केलेल्या ‘अष्टसूत्री प्रगती’ जाहीरनाम्यामुळे भाजप नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, त्यातूनच मेट्रो आणि पीएमटी बस सेवा मोफत देण्याच्या घोषणेवर टीका केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी केला आहे.
अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणेकरांसमोर मांडलेल्या जाहीरनाम्यात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आठ स्तंभांवर आधारित धोरण मांडण्यात आले आहे. यामध्ये दररोज पाणीपुरवठा, वाहतूककोंडीमुक्त आणि खड्डेमुक्त रस्ते, विज्ञाननिष्ठ स्वच्छता व्यवस्था, हाय-टेक आरोग्य सेवा, प्रदूषणमुक्त पुणे, झोपडपट्टी पुनर्वसन, सुरक्षित पुनर्विकास, मोफत मेट्रो व पीएमटी बस प्रवास, छोट्या घरांसाठी मालमत्ता कर सवलत, विद्यार्थ्यांना मोफत टॅब्लेट, स्वयंरोजगारासाठी व्याजमुक्त कर्ज, जलद प्रतिसादक्षम प्रशासन आणि ‘पुणे मॉडेल’ शाळा उभारणी अशा अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
या घोषणांना पुणेकरांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून भाजपचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसेच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मेट्रो व पीएमटी बस सेवा मोफत देण्याच्या प्रस्तावावर टीका केली. मात्र ही टीका राजकीय भीतीपोटी असल्याचा आरोप रोहन सुरवसे पाटील यांनी केला आहे.
ते म्हणाले, “पुणे शहरातील सर्व ४१ प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवारांना सभा, रॅली आणि पदयात्रांमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हा वाढता जनसमर्थन पाहून भाजप नेते अस्वस्थ झाले असून, त्यामुळेच ते जाहीरनाम्यातील महत्त्वाच्या योजनांवर टीका करत आहेत.”
मेट्रो आणि पीएमटी बस सेवा मोफत करण्याच्या घोषणेबाबत अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली असल्याचे रोहन सुरवसे पाटील यांनी सांगितले. “पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका दरवर्षी पीएमपीला अनुदान देतात, तरीही तोटा वाढतो. जर सार्वजनिक वाहतूक मोफत केली तर खासगी वाहनांचा वापर कमी होईल, वाहतूककोंडी घटेल, वेळ आणि इंधनाची बचत होईल आणि त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान टळेल. हे शहराच्या अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरेल,” असे अजित पवार यांनी सांगितले आहे.
असे असताना भाजपचे मंत्री या वास्तवाकडे दुर्लक्ष का करत आहेत, असा सवाल रोहन सुरवसे पाटील यांनी उपस्थित केला असून, पुणेकरांचा राष्ट्रवादीकडे वाढता कल हाच भाजपच्या टीकेमागील खरा कारण असल्याचा दावा त्यांनी केला आहे.


