पिंपरी- : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान १५ जानेवारी रोजी व मतमोजणी १६ जानेवारी रोजी होत आहे. ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी महापालिकेची निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणूक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांनी ही प्रक्रिया सुरळितपणे पार पाडण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिले.
निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगुळकर नाट्यगृह येथे निवडणूक कामकाजाविषयक आढावा बैठक आयुक्त हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे यांच्यासह उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी हिम्मत खराडे, अर्चना तांबे, अनिल पवार, दीप्ती सूर्यवंशी, नितीन गवळी, सुप्रिया डांगे, अर्चना पठारे, पल्लवी घाडगे यांच्यासह महापालिकेचे सह आयुक्त मनोज लोणकर, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त अण्णा बोदडे, डॉ. प्रदीप ठेंगल, पंकज पाटील, संदीप खोत, चेतना केरूरे, व्यंकटेश दुर्वास, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, प्रसार माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समितीचे सदस्य सचिव तथा विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी, सेक्टर अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.
आयुक्त हर्डीकर म्हणाले, महापालिका निवडणूक प्रचार कालावधी १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता संपत आहे. त्यानंतर प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया संपेपर्यंतचा कालावधी महत्त्वाचा असतो. अशावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच कोणताही अनुसूचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनासोबत समन्वय साधून बारकाईने लक्ष ठेवा. याकाळात आचारसंहिता कक्षाने प्रभावीपणे एसएसटी, एफएसटी, व्हीएसटी अशी विविध पथके कार्यरत ठेवावीत. मतदार चिठ्ठ्या मतदारांपर्यंत वाटप करण्याचे काम विहित वेळेत पूर्ण करावे. ईव्हीएम हाताळणी आणि ईव्हीएमची वाहतूक यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा केल्यास नियमान्वये कारवाई करण्यात येईल, असे देखील त्यांनी सांगितले.
मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी, कर्मचारी तसेच मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक असणारे साहित्य मतदान केंद्रावर घेऊन जाण्यासाठी वाहतुकीचे सखोल नियोजन करण्यात यावे. प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडत असताना आवश्यक बाबींची माहिती संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना द्यावी. मतदान प्रक्रिया ही संवेदनशील बाब असून प्रत्येकाने जबाबदारीने काम करावे. मतदानाचा लेखोजोखा अत्यंत बारकाईने संकलित करावा. अभिरूप मतदान (मॉक पोल) व्यवस्थित घेऊन राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या नमुन्यानुसार त्याचे प्रमाणपत्र तयार करण्यात यावे, असे निर्देश देखील आयुक्त हर्डीकर यांनी दिले.
अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी महापालिका निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची मुदत संपल्यानंतर आचारसंहिता भंगाच्या आलेल्या तक्रारींवर कशा प्रकारे कारवाई करावी, याबाबत मार्गदर्शन केले. तर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी मतदान प्रक्रियेच्या दिवशी प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने सादर करावयाच्या कामकाज अहवालाबाबत माहिती दिली. निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी मतदान प्रक्रिया व मतमोजणीच्या अनुषंगाने निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या तयारीबाबत सादरीकरण केले.
………..
सायंकाळपासून तातडीने जाहीर प्रचाराचे बॅनर्स, झेंडे काढून घेण्यात यावेत….
महापालिका निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची मुदत मंगळवार १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता संपणार आहे. त्यानंतर उमेदवार, पक्ष यांच्या जाहीर प्रचाराचे बॅनर्स, झेंडे, पोस्टर्स तातडीने हटवण्याचे काम संबंधित क्षेत्रीय कार्यालयांनी करावे. पुढील ७२ तास आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचे असून या काळात चांगल्या पद्धतीने व नियोजनपूर्वक काम करा, असेही आयुक्त श्रावण हर्डीकर यावेळी म्हणाले.


