पुणे : देशाच्या संरक्षण क्षमतेला बळ देणारी आणि गेल्या दीडशे वर्षांपासून पुण्यात साकारली जाणारी स्वदेशी शस्त्रास्त्रे आता पुणेकरांना प्रत्यक्ष पाहता येणार आहेत. ऍम्युनिशन्स इंडिया लिमिटेडकडून पुण्यात तयार होणारी आणि भारतासह विविध देशांमध्ये निर्यात होणारी भारतीय बनावटीची लष्करी शस्त्रास्त्रे व दारूगोळ्यांचे भव्य प्रदर्शन श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हे विशेष प्रदर्शन दि. २५ व २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले असून, जय गणेश प्रांगण, बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरासमोर पुणेकरांना ते पाहता येणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली.
या प्रदर्शनामध्ये भारतीय पायदळ, नौदल आणि हवाई दलासाठी वापरली जाणारी विविध प्रकारची शस्त्रास्त्रे, दारूगोळा तसेच युद्धसज्जतेसाठी आवश्यक असलेल्या साधनांची प्रतिकृती (मॉडेल्स) ठेवण्यात येणार आहेत. लष्करातील अनुभवी जवान प्रदर्शनाच्या नियोजनात सक्रिय सहभागी असून, उपस्थित नागरिकांना प्रत्येक शस्त्राविषयी सविस्तर माहिती तात्काळ मिळणार आहे.
ग्रेनेड, लढाऊ विमानांमध्ये वापरले जाणारे बॉम्ब, विविध प्रकारचे रॉकेट, तोफांसाठी लागणारा दारूगोळा, ड्रोन, मल्टी बॅरल लॉन्च सिस्टिम, बुलेट्स, हँड ग्रेनेड, अँटी सबमरीन रॉकेट, एरियल बॉम्ब यांसह अनेक प्रकारची आधुनिक व स्वदेशी शस्त्रास्त्रे या प्रदर्शनाचे आकर्षण ठरणार आहेत.
ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी सांगितले की, भारतीय संरक्षण दल हे जगातील चौथ्या क्रमांकाचे शक्तिशाली सैन्य असून अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारताचा क्रमांक लागतो. या संरक्षण व्यवस्थेमध्ये पुणे हे एक महत्त्वाचे केंद्र असून, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA), सीएमई आणि डीआरडीओ यांसारख्या नामांकित संस्था येथे कार्यरत आहेत.
संपूर्ण देशासाठी शस्त्रास्त्रांची निर्मिती करणारी ऍम्युनिशन्स इंडिया लिमिटेड पुण्यात कार्यरत असून, त्यांच्या सहकार्याने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनासाठी प्रवेश विनामूल्य असून, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच सर्व पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


