पुणे : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात लवकरच नव्या अत्याधुनिक बस दाखल होणार आहेत. ३ बाय २ आसन रचनेच्या तब्बल ५५ आसनी या नव्या बसना ‘राजमाता जिजाऊ’ असे नाव देण्यात आले असून, हिंदवी स्वराज्याच्या जननी राजमाता जिजाऊ यांच्या स्मरणार्थ हे नामकरण करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

या नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बस मार्च महिन्यापासून टप्प्याटप्प्याने राज्यभर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. भगव्या आणि शुभ्र पांढऱ्या रंगसंगतीत सजलेल्या या बस महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचे आणि अस्मितेचे चालते-बोलते प्रतीक ठरणार असल्याचेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.
याबाबत माहिती देताना सरनाईक म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असून त्यांच्या स्वराज्याच्या संकल्पनेमागे उभी असलेली प्रेरणाशक्ती म्हणजे राजमाता जिजाऊ. त्या अर्थाने त्या हिंदवी स्वराज्याच्या जननी ठरतात. त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ एसटीच्या नव्या बसना ‘राजमाता जिजाऊ’ असे नाव देण्यात आले आहे.
एसटी महामंडळाने यापूर्वी शिवनेरी, शिवशाही, शिवाई, यशवंती आणि हिरकणी अशा विविध सेवांच्या माध्यमातून बसना ऐतिहासिक व सांस्कृतिक नावांनी गौरवले आहे. ‘राजमाता जिजाऊ’ या नव्या सेवेमुळे या परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सध्या एसटीच्या बहुतांश बसमध्ये सुमारे ४० प्रवाशांची आसनक्षमता आहे. मात्र नव्याने दाखल होणाऱ्या ‘राजमाता जिजाऊ’ बसमध्ये ५५ प्रवाशांना बसण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे गर्दीच्या मार्गांवर उभे राहून प्रवास करणाऱ्या सुमारे १५ प्रवाशांना बसण्याची सोय होणार आहे.
विशेषतः दोन शहरांदरम्यानच्या अतिगर्दीच्या मार्गांवर ही सेवा सुरू करण्याचा एसटी महामंडळाचा मानस असल्याचेही मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. या नव्या बसमुळे प्रवाशांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ होण्यासोबतच एसटी सेवेला अधिक आधुनिक आणि आकर्षक स्वरूप मिळणार आहे.


