29.1 C
New Delhi
Friday, March 6, 2026
Homeज़रा हट केआठवणींच्या गंधकोशी…..एक आनंददायी स्मरणयात्रा

आठवणींच्या गंधकोशी…..एक आनंददायी स्मरणयात्रा

आपल्या देशात ” सोशल मीडिया” पर्व सुरू होण्याच्या आधीच्या काळात, म्हणजे विसाव्या शतकात संगीत समारोह, संगीत नाटके, नामवंत कलाकारांच्या मैफली, व्याख्यानमाला, इ. विविध कार्यक्रम यांचे आयोजन केले जायचे आणि या सर्व कार्यक्रमांना रसिक श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद मिळायचा.महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यामध्ये असे कार्यक्रम संपन्न होत. विशेष करून पुणे, मुंबई, ठाणे, औरंगाबाद, नांदेड, कोल्हापूर, पंढरपूर, आणि इतर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम संपन्न व्हायचे. हे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अनेक संस्था, आणि सेवाभावी वृत्तीचे कार्यकर्ते यांचे महत्वाचे योगदान असे.


आपल्या सर्वांनाच परिचित असलेले पंढरपूर हे गाव श्री.विठ्ठल रखुमाई यांच्या मंदिरामुळे महाराष्ट्रातील सर्वांचे श्रद्धास्थान बनले. आषाढी कार्तिकी वारी आणि होणारे कीर्तन प्रवचनांचे कार्यक्रम सतत सुरू असतात. पण त्याचबरोबर
पंढरपूर शहरात नामवंत कलाकारांच्या मैफली, विविध व्याख्यानमाला, इ.कार्यक्रमही संपन्न होत असत. साधारणपणे १९८० पासून अंदाजे २००५ या कालावधीत पंढरपुरात आयोजित झालेल्या कार्यक्रमाच्या आठवणी कथन करणारे ” आठवणींच्या गंधकोशी” हे प्रदीप भडगावकर यांचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. हे पुस्तक कलाप्रेमी रसिक वाचकांना निश्चितच आवडेल असे
आहे.

या पुस्तकाचे लेखक प्रदीप भडगावकर हे पंढरपूर अर्बन को.ऑप. बँकेत नोकरी करून “शाखा व्यवस्थापक” या पदावरून निवृत्त झालेले अधिकारी आणि उत्तम तबलावादक अशी त्यांची ओळख. निवृत्त झाल्यानंतर त्यांनी हे लेखन केले आहे त्यामुळे गेल्या पस्तीस चाळीस वर्षाचा पंढरपूरचा सांस्कृतिक इतिहास वाचकाच्या डोळ्यासमोर उभा राहतो.

१९६१ सालात भाऊसाहेब बडवे आणि इतर कलाप्रेमी सहकारी यांच्या पुढाकारातून “संगीत कला केंद्र” या संस्थेची स्थापना झाली आणि या संस्थेच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन होऊ लागले. त्यानंतर १९८५ पासून “स्वरसाधना” या नावाने विविध कार्यक्रम आयोजित झाले. भागवताचार्य वा. ना.उत्पात, पां.रा. बडवे, बबनराव बडवे, अरुण खडके, पुरुषोत्तम खडके,डॉ.मिलिंद जोशी, वसुधा काणे, प्रदीप भडगावकर असे स्वरसाधनेचे पदाधिकारी होते. भडगावकर यांनी कोषाध्यक्ष पदाची धुरा बरीच वर्षे यशस्वीपणे सांभाळली. एखादा कार्यक्रम ठरविण्यासाठी कलाकारांची संपर्क साधणे, आर्थिक व्यवहार ठरवणे,भोजन आणि निवास व्यवस्था करणे, कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करणे,मंचव्यस्था, साउंड इ. चे नियोजन अशा जबाबदाऱ्या आयोजक संस्थेच्या कार्यकर्त्यांना सांभाळाव्या लागतात. उत्तम टीमवर्क असल्यामुळे स्वरसाधनेचा आजपर्यंतचा यशस्वी प्रवास सुरू आहे.

१९८६ मध्ये प्रसिद्ध गायिका माणिक वर्मा ह्यांच्या शष्ठ्यब्दीपूर्तिनिमित्त सरगम टॉकीज येथे आयोजित करण्यात आलेला सत्कार सोहोळा आणि गायन कार्यक्रम, १९८७ साली पंढरपूर बँकेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेला गायिका उषा मंगेशकर, संगीतकार राम कदम,गायक चंद्रशेखर गाडगीळ यांचा कार्यक्रम.उस्ताद अल्लारखा, उस्ताद झाकीर हुसेन,
छोटा गंधर्व,अभिनेत्री हेमा मालिनी,भजन सम्राट अनुप जलोटा आणि इतर नामवंत कलावंत ह्यांच्या झालेल्या गाठीभेटी, ह्यासंबंधीच्या आठवणी ह्या पुस्तकात वाचायला मिळतात. विशेष म्हणजे उषाताई मंगेशकर ह्याच्या प्रभू कुंज ह्या निवास स्थानी भेट घेण्याचा योग आला .या भेटीत साक्षात लता मंगेशकर यांचेही दर्शन झाले आणि त्यांच्याशी औपचारिक असा संवादही झाला. त्यानंतर तीन चार वेळा कार्यक्रमाच्या निमित्ताने
पेडर रोडच्या “प्रभू कुंज” या स्वरमंदिरात जायला मिळाले. वेगवेगळ्या नामवंत कलाकारांच्या गाठीभेटी, त्यांच्याशी झालेला संवाद आणि त्यांचा मिळालेला सहवास ह्याला लेखकाने “सत्संग” असे म्हटले आहे आणि ते खरेही आहे. जे नामवंत आणि दिग्गज कलाकार कार्यक्रमाच्या निमित्ताने पंढरपुरात आले त्यातल्या काही निवडक कलावंताच्या आठवणी लेखकाने शब्दबद्ध केल्या आहेत.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद अल्लारखाॅ, उस्ताद झाकीर हुसेन, इंदिरा खाडिलकर, माणिक वर्मा, पं.छोटा गंधर्व, शहनाईवादक उस्ताद बिस्मिल्ला खान, पंडित जसराज, संगीतकार श्रीनिवास खळे, उषाताई मंगेशकर, संतुरवादक पं.शिवकुमार शर्मा, शैला दातार, अशा नामवंत कलाकारांच्या आठवणी आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतात. या आठवणीव्यतिरिक्त दिग्गज कलावंतांचा सहवास, भेटीगाठी, सांगीतिक गप्पा यासंबंधीही थोडक्यात माहिती आढळते. यामध्ये पं.भीमसेन जोशी, पं.जितेंद्र अभिषेकी,संगीतकार सुधीर फडके, यशवंत देव, पं.सुरेश तळवलकर, पं.हरिप्रसाद चौरासीया, पं.विजय घाटे, पं. भवानीशंकर,आप्पा जळगावकर,प्रभाकर कारेकर, रामदास कामत,प्रभा अत्रे, मालिनी राजुरकर, पं.रामनारायण, ब्रीजनारायण आणि इतर नामवंत कलावंतांचा समावेश आहे.
“स्वरसाधना” संस्थेच्या वतीने गेल्या पस्तीस चाळीस वर्षात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची यादी फार मोठी आहे. शास्त्रीय आणि उपशास्त्रीय कार्यक्रमात सुमारे ऐशी दिग्गज कलावंतांनी हजेरी लावली आहे. गायनाव्यतिरिक्त वाद्यवादनाचे स्वतंत्र कार्यक्रमही मोठ्या प्रमाणावर संपन्न झाले.तबलावादनाचे २४, सतारवादनाचे ११, संतुरवादनाचे ५, सारंगिवादनाचे ४, संवादिनिवादनाचे ५,व्हायोलिनवादनाचे ५ असे कार्यक्रम झाले. त्याचबरोबर ऑर्गन वादन, सुंद्रीवादन, पखवाजवादन, जलतरंग वादन आयोजित करण्यात आले. पंढरपुरातल्या सांस्कृतिक विश्वात “स्वरसाधना” संस्थेचे योगदान हे नुसते उल्लेखनीयच नाही तर “विक्रमी” आहे असे म्हणावे लागेल.स्वरसाधना संस्थेच्या सर्व कार्यक्रम आयोजनामध्ये लेखक प्रदीप भडगावकर यांचा महत्त्वपूर्ण आणि सक्रिय सहभाग राहिलाच पण त्याबरोबर पंढरपूर अर्बन बँकेच्या वतीने कुठल्या ना कुठल्या निमित्ताने जे कार्यक्रम आयोजित केले जायचे त्याचीही जबाबदारी लेखकावर होती. १९८७ मध्ये बँकेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रम आयोजननिमित्ताने भजनसम्राट अनुप जलोटा यांची भेट घेतली पण कार्यक्रम काही न काही कारणांनी रद्द झाला. बँकेच्या महिला शाखेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त प्रसिद्ध अभिनेत्री नृत्यांगना हेमा मालिनी ह्याचा कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरले. त्यानुसार लेखक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हेमा मालिनी ह्यांची मुंबईला त्यांच्या कार्यक्रमात भेटही घेतली पण काही अपरिहार्य कारणामुळे हेमा मालिनी ह्यांचा कार्यक्रम होऊ शकला नाही. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ह्यांची सात दिवसाची शिवचरित्र व्याख्यानमाला जिजामाता उद्यान येथे बँकेच्या वतीने आयोजित करण्यात आली. यानिमित्ताने एक दिवस बाबासाहेब लेखकाच्या घरी भोजनासाठी आले आणि त्यांच्याशी भरपूर गप्पा झाल्या. संत साहित्याचे गाढे अभ्यासक पं.दाजी पणशीकर व्याख्यानानिमित्त येत असत. त्यांचेही लेखकाशी कौटुंबिक नाते निर्माण झाले होते. एकदा पणशीकर सहकुटुंब लेखकाकडे भोजनानिमित्त आले आणि त्यांनी लेखकाच्या पत्नीचा (सौ.सीमा भडगावकर) खास मुंबईहून आणलेली साडी देऊन सन्मान केला.
पुस्तक वाचताना लेखकाने काही गमतीदार असे प्रसंग नमूद केले आहेत. प्रसिद्ध गायिका माणिक वर्मा कार्यक्रमासाठी पंढरपुरात येतात आणि लेखकाच्या घरी येतात स्वतःच्या हाताने खिचडी करून घेतात, घरच्या दत्तमंदिरात गायनसेवा करतात आणि लेखक त्यांना तबला साथ करतात .उस्ताद अल्लारखा कार्यक्रमाआधी पांडुरंगाच्या दर्शनाला जातात आणि दर्शनानंतर रंगशिळेवर अर्धा तास मनसोक्त तबलावादन करतात त्यानंतर ते लेखकाच्या घरी जातात, वाड्यात असलेल्या दत्तमंदिरात दत्तगुरूंचे दर्शन घेतात आणि म्हणतात ” आपके शहरमे सभी जगह मंदिर है, मानो तो यह गावही एक मंदिर है. गणेशजी आद्य पखवाजी है और पखवाजवादन कला का आरंभ उनसेही शुरू हुवा” एव्हढे म्हणून ते थांबत नाही तर कुठलाही साज नसतानादेखील एक “गणेशपरण” पेश करतात. १९९० मध्ये शहनाई वादक उस्ताद हे पंढरपूरला आले होते. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने बांधलेल्या गोपुराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यानिमित्ताने उस्तादशींशी बातचीत करण्याचा योग आला. असे अनेक वेगवेगळे प्रसंग आपल्याला या पुस्तकात आढळतात.
एकूण पाहिले तर “आठवणींच्या गंधकोशी” हे पुस्तक म्हणजे पंढरपूरच्या सांस्कृतिक विश्वातल्या घडामोडीचा एक वास्तव इतिहासच आहे.त्यामुळे ह्या पुस्तकाला “संदर्भमुल्य” प्राप्त झाले आहे.पुस्तकाच्या शेवटच्या भागात कलावंतांना दिलेली मानपत्रे तसेच काही पत्रांच्या छायांकित प्रति समाविष्ट केल्या आहे मानपत्रांचे लेखनही अत्यंत वाचनीय आहे.(ह्या सर्व मानपत्रांचे लेखन भागवताचार्य श्री. वा.ना. उत्पात यांनी केलेले आहे.) विशेष म्हणजे ह्या पुस्तकाचे लेखन विनम्रपणे एक सेवाभावी आणि निस्वार्थी वृत्तीचा प्रामाणिक कार्यकर्ता या भूमिकेतून लेखकाने केले आहे. कार्यक्रम आयोजित करताना चांगले वाईट अनुभव येत असतात. पण या पुस्तकात फक्त चांगले अनुभव चित्रित केले आहेत.वेळोवेळी नोंदी केल्यामुळे त्या काळातील वातावरणाची कल्पना वाचकांना येते.
पंढरपूर बँकेतून “शाखा व्यवस्थापक” पदावरून
निवृत्त झाल्यानंतर ह्या पुस्तकाचे लेखन श्री.प्रदीप भडगावकर यांनी केले आणि अत्यंत आकर्षक मुखपृष्ठासह, हे माहितीपूर्ण पुस्तक स्वतःच प्रकाशित केले आहे.
या पहिल्या साहित्यकृतीनिमित्त लेखकाचे मन:पूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा…!!

आठवणींच्या गंधकोषी(ललित लेख)
लेखक /प्रकाशक प्रदीप भडगावकर
पुणे..४११०३३
पृष्ठे ९४ मूल्य..रु.१५०/-

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
29.1 ° C
29.1 °
29.1 °
14 %
2.1kmh
0 %
Fri
29 °
Sat
36 °
Sun
39 °
Mon
39 °
Tue
38 °

Most Popular

Recent Comments